कुलभूषण जाधव यांना दाद मागण्याचा अधिकार- पाकिस्तान

टीम ई सकाळ
बुधवार, 12 एप्रिल 2017

भारताची भूमिका अमान्य

या प्रकरणी पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसित यांना समन्स बजाविण्यात आले आहे. जाधव यांच्या प्रकरणात योग्य ती कायदेशीर प्रक्रिया केली असल्याचे सांगत संरक्षणमंत्री मोहंमद यांनी भारताची ही भूमिका अमान्य केली. 

लाहोर : कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या निर्णयाविरोधात पाकिस्तानी लष्कराच्या अपिलीय न्यायालयात दाद मागण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यासाठी त्यांना 60 दिवसांची मुदत आहे, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहंमद असीफ यांनी सांगितले. कुलभूषण जाधव यांना तातडीने फाशीची शिक्षा देण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. 

संसदेत बोलताना असीफ यांनी सांगितले की, जाधव यांना लष्कराच्या अपीलीय न्यायालयात 60 दिवसांत जाण्याचा अधिकार असून, त्यानंतर ते लष्करप्रमुख आणि राष्ट्राध्यक्षांकडे दयेची याचिकाही दाखल करू शकतात, असे 'डॉन'च्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या 1952च्या लष्करी कायद्यातील कलम 131 नुसार 60 दिवसांत नव्हे तर 40 दिवसांमध्ये अपील करण्याची तरतूद आहे. 

जाधव यांनी भारतासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून त्यांना पाकिस्तानातील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र, जाधव यांनी पाकिस्तानमध्ये कोणतेही गैरकृत्य केल्याचा एकही पुरावा नाही. त्यामुळे जाधव यांची पाकिस्तानकडून पूर्वनियोजित हत्या होत असल्याची भूमिका भारताने व्यक्त केली आहे. या प्रकरणी पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसित यांना समन्स बजाविण्यात आले आहे. जाधव यांच्या प्रकरणात योग्य ती कायदेशीर प्रक्रिया केली असल्याचे सांगत संरक्षणमंत्री मोहंमद यांनी भारताची ही भूमिका अमान्य केली. 

असीफ म्हणाले, "पाकिस्तानात देशातील किंवा सीमेपलीकडून दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असणारे देशहिताला बाधक घटक, तसेच पाकिस्तानची सुरक्षितता आणि एकतेविरुद्ध कट रचणाऱ्यांची गय केली जाणार नाही."