कॅलिफोर्नियात भीषण आगीत दहा जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

या आगीचा सर्वाधिक फटका सांता रोजाला बसला आहे. कॅलिफोर्नियाच्या वन विभागाच्या मते सोनमा काउंटीत आगीमुळे सात जण मृत्युमुखी पडले. तर नेपामध्ये दोन आणि मेंडोसिनो काउंटीत एकाचा मृत्यू झाला आहे. नॅशनल वेदर सर्व्हिसने सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत आग पसरण्याचा इशारा दिला आहे

सांता रोजा - कॅलिफोर्नियातील जंगलात रविवारी रात्री भीषण आग लागल्याने आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीत सुमारे दीड हजार इमारती जळून खाक झाल्या आहेत. शंभराहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. ही आग वेगाने पसरत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

सोमवारी दिवसभर अग्निशामक दलाचे शेकडो बंब आग विझवण्यासाठी निकाराचे प्रयत्न करत होते. दरम्यान, राज्याचे गव्हर्नर जेरी ब्रॉन यांनी सोनोमा आणि यूबा येथे आपत्कालीन स्थिती लागू करण्यात आली आल्याचे सांगून सुमारे 20 हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी नेल्याचे नमूद केले. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

फायर सिक्‍युरिटी डिपार्टंमेटचे प्रमुख किम पिमलोट यांच्या मते, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व यंत्रणा उपलब्ध असून, प्रारंभी या ठिकाणहून सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास आमचे प्राधान्य असेल. या आगीचा सर्वाधिक फटका सांता रोजाला बसला आहे. कॅलिफोर्नियाच्या वन विभागाच्या मते सोनमा काउंटीत आगीमुळे सात जण मृत्युमुखी पडले. तर नेपामध्ये दोन आणि मेंडोसिनो काउंटीत एकाचा मृत्यू झाला आहे. नॅशनल वेदर सर्व्हिसने सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत आग पसरण्याचा इशारा दिला आहे. हवेचा वेग आणि दुष्काळामुळे आग पसरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अग्निशामक दलाच्या मते, रविवारी रात्री भडकलेली आग 73 हजार एकर क्षेत्रावर पसरली आहे. आगीची तीव्रता पाहून दोन रुग्णालये रिकामे करावे लागले.