बेछूट गोळीबारात अमेरिकेत 50 ठार; शेकडो जखमी

वृत्तसंस्था
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

या घटनेत 50 जण मृत्युमुखी पडले असून, सुमारे दोनशे पेक्षा अधिक जण जखमी झाले. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती स्थानिक पोलिस अधिकारी जोसेफ लोंबार्डो यांनी पत्रकार परिषदेत दिली. हल्ल्याचे स्वरूप पाहता मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढण्याची शक्‍यताही पोलिसांनी वर्तवली आहे

लॉस एंजेलिस - अमेरिकेतील लास व्हेगास शहरात आयोजित संगीताच्या कार्यक्रमात हल्लेखोराने केलेल्या बेछूट गोळीबारात सुमारे 50 जण मृत्युमुखी पडले असून, दोनशेपेक्षा अधिक जण जखमी झाले. स्थानिक वेळेनुसार रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कार्यक्रमाला सुमारे तीस हजार नागरिक उपस्थित होते. अचानक गोळीबार सुरू झाल्यानंतर उपस्थित नागरिक सैरावैरा धावत होते. त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अमेरिकेच्या इतिहासातील ही अलीकडच्या काळातील गोळीबाराची सर्वांत मोठी घटना मानली जाते.

संगीताचा कार्यक्रम (म्युझिक कॉन्सर्ट) सुरू असलेल्या ठिकाणाच्या शेजारी मांडाले बे कॅसिनो असून, या हॉटेलच्या 32व्या मजल्यावरून हल्लेखोराने अत्याधुनिक शस्त्रातून गोळीबार केला. शीघ्र कृतिदलाच्या जवानांनी तत्काळ हॉटेलमध्ये प्रवेश करून कारवाई करत 64 वर्षीय हल्लेखोराला ठार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ठार करण्यात आलेल्या हल्लेखोराचे नाव स्टीफन पॅडॉक असल्याचे समजते.
""संगीताचा कार्यक्रम सुरू असताना शेजारी असलेल्या हॉटेलच्या इमारतीच्या 32व्या मजल्यावरून हल्लेखोराने स्वयंचलित शस्त्रातून बेछूट गोळीबार केला. या घटनेत 50 जण मृत्युमुखी पडले असून, सुमारे दोनशे पेक्षा अधिक जण जखमी झाले. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती स्थानिक पोलिस अधिकारी जोसेफ लोंबार्डो यांनी सोमवारी पहाटे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. हल्ल्याचे स्वरूप पाहता मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढण्याची शक्‍यताही पोलिसांनी वर्तवली आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. हल्लेखोराला ठार करण्यात यश आले असून, त्याच्या एका महिला साथीदाराला ताब्यात घेण्यात आले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

ठार केलेल्या हल्लेखोराच्या हॉटेलमधील खोलीतून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. पोलिस आणि "एफबीआय'कडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.