'आरोग्यदायी रस्त्यां'मुळे लंडनच्या वाहतूक व्यवस्थेचा कायापालट?

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जून 2017

लंडनमधील 80% प्रवास हा "सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सायकल वा चालत' केला जाऊ शकेल, अशा कल्पनेचा या योजनेमध्ये अंतर्भाव आहे. या तीनही पर्यायांना चालना देण्याची क्षमता असलेले "आरोग्यदायी रस्ते' (हेल्दी स्ट्रीट्‌स) या प्रकल्पांर्गत विकसित केले जाणार आहेत

लंडन - ब्रिटनची राजधानी असलेल्या लंडन शहरामधील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या उद्दिष्टार्थ या जगप्रसिद्ध शहराचे महापौर सादिक खान यांनी एक महत्त्वांकांक्षी योजना मांडली आहे.

लंडनमधील 80% प्रवास हा "सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सायकल वा चालत' केला जाऊ शकेल, अशा कल्पनेचा या योजनेमध्ये अंतर्भाव आहे. या तीनही पर्यायांना चालना देण्याची क्षमता असलेले "आरोग्यदायी रस्ते' (हेल्दी स्ट्रीट्‌स) या प्रकल्पांर्गत विकसित केले जाणार आहेत. याचबरोबर, लंडनकरांनी चांगल्या आरोग्याच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील असलेला चालण्याचा व्यायाम रोज किमान 20 मिनिटे करावा, यासाठी आवश्‍यक सुविधा उभारण्यात येणार आहेत.

"लंडनमध्ये गाडी न चालविणे हे सुरक्षित, परवडण्याजोगे व सर्वांत सोयीचे असावयास हवे,' अशी भावना खान यांनी ही योजना मांडताना व्यक्त केली. खान यांच्या "नवी वाहतूक व्यवस्था' धोरणाचा हा पहिला भाग असून यामध्ये लंडन शहरामधील लोकसंख्येचे गाड्यांवरील अवलंबित्व कमी करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट बाळगण्यात आले.

"आपल्या शहरामधील वाहतूक नियमनासंदर्भात आपण महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट बाळगावयास हवे. लंडनमधील गाड्यांच्या फेऱ्या या दिवसाला 30 लाखांनी कमी होतील, हे या योजनेमागील मुख्य उद्दिष्ट आहे,'' असे खान यांनी यावेळी सांगितले