निवडणुकांमुळे जूनमध्ये 'मे' अडचणीत

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जून 2017

हुजूर पक्षाच्या माझ्या सहकाऱ्यांमध्ये निवडणुकांची कोणतीही इच्छा मला दिसत नव्हती. तरीही आम्हाला निवडणुकांना सामोरे जावे लागले. त्यामुळे निर्माण झालेल्या अनिश्‍चिततेचा सामना सर्वांनाच करावा लागत आहे.
- ग्रॅहम ब्रॅडी, अध्यक्ष, हुजूर पक्षाची 1922ची समिती

ब्रिटनच्या पंतप्रधानांना सहकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार

लंडन: युरोपीयन महासंघातून बाहेर पडण्यासाठी केलेली मुदतपूर्व निवडणुकांची खेळी अंगलट आल्यानंतर आता ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना त्यांचे सहकारी आणि हुजूर पक्षाच्या खासदारांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. मे या सहकाऱ्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करत असल्या तरी त्यामध्ये त्यांना कितपत यश येते, यावर ब्रिटनच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे.

संसदेचा तीन वर्षांचा कार्यकाळ बाकी असताना एप्रिल महिन्यात थेरेसा मे यांनी अचानक मुदतपूर्व निवडणुका जाहीर केल्या. ब्रेग्झिटचा निर्णय पुढे रेटण्यासाठी आवश्‍यक बहुमत हुजूर पक्षाला या निवडणुकांत मिळेल, हा मे यांचा अंदाज मात्र सपशेल फोल ठरला. शुक्रवारी जाहीर झालेल्या निवडणूक निकालांत मे यांच्या हुजूर पक्षाला बहुमत गाठता आले नाही. हुजूर पक्षाला 650 पैकी 318, तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या मजूर पक्षाला 261 जागांवर विजय मिळाला. दरम्यान, पंतप्रधान मे यांनी राणी एलिझाबेथ द्वितीय यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतरही हुजूर पक्षाचे खासदार मात्र संतप्त आहेत. या संतप्त खासदारांचा राग शांत करण्यासाठी मे यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते.

सध्या सत्तास्थापनेसाठी मे यांच्या पक्षाला आठ खासदारांच्या संख्याबळाची आवश्‍यकता असून युरोस्केप्टिक नॉर्थर्न आयरिश डेमोक्रेटिक युनियनिस्ट पक्षाच्या दहा खासदारांचा पाठिंबा मिळविण्याची तयारी त्यांनी सुरू केलेली आहे. डेमॉक्रॅटिक युनियनिस्ट पक्षाच्या दहा खासदारांचा आपल्या पक्षाला पाठिंबा असल्याचे सांगत मे यांनी सत्तास्थापनेचा दावा केला आहे. बॅकिंगहॅम प्रासादात राणी एलिझाबेथ द्वितीय यांची भेट घेऊन मे यांनी सत्तास्थापनेचे पत्रही सुपूर्त केले.

बहुमत प्राप्त करण्यात अपयशी ठरल्यामुळे हुजूर पक्षातील नेत्यांनीही मे यांच्यावर टीकास्त्र सोडले. निकालानंतर मे यांनी पक्षाच्या प्रमुखपदी राहाणे कितपत योग्य आहे, असा सवाल हुजूर पक्षाच्या खासदार ऍना सोबरी यांनी उपस्थित केला.

ब्रिटनमधील पक्षीय बलाबल
एकूण : 650
हुजूर पक्ष : 318
मजूर पक्ष : 261
स्कॉटिश नॅशनल पक्ष : 31
डेमोक्रेटिक युनियनिस्ट पक्ष : 10