मराठी स्वातंत्र्यसैनिकाचा पणतू होणार आयर्लंडचा पंतप्रधान?

शिवप्रसाद देसाई
मंगळवार, 23 मे 2017

लिओ यांचे सख्खे चुलत भाऊ असलेले वसंत वराडकर म्हणाले, “लिओ यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यांना भारतीय संस्कृतीबद्दल खूप आदर आहे. रामायण, महाभारत ही महाकाव्ये त्यांनी इंग्रजी भाषेतून अनेकदा वाचली. ते आयर्लंडचे पंतप्रधान होतील याची खात्री आहे. त्यामुळे आम्ही रोषणाईची तयारी केली आहे. हा आनंदोत्सव गोडधोड करून साजरा करणार आहोत.”

ब्रिटिशांच्या जुलमातून भारत मुक्त व्हावा यासाठी तुरुंगवास सोसलेल्या वराड (ता. मालवण) येथील वराडकर कुटुंबाचा वंश असलेले लिओ वराडकर हे आज याच ब्रिटनचा भाग असलेल्या आयर्लंडच्या पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार बनले आहेत. ते यात विजयी होतील असा विश्‍वास येथील त्यांच्या कुटुंबियांना असून जल्लोषाची तयारी सुरूही केली आहे.

मालवणी रक्त सातासमुद्रापार गेले तरी आपल्या कर्तृत्वाचे झेंडे रोवण्यात कमी पडत नाही हे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झाले आहे. असेच मुळ मालवणी असलेले लिओ अशोक वराडकर सध्या आयर्लंडच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत. जूनमध्ये होणार्‍या या निवडणुकीतील ते प्रमुख दावेदार मानले जात आहेत.
38 वर्षीय लिओ यांचा राजकारणातील प्रवास खूप वेगवान आहे. ते पेशाने डॉक्टर आहेत. डबलीग हे त्यांच्या कर्तृत्वाचे मुख्य ठिकाण. सुरवातीला उपमहापौर, त्यानंतर आयर्लंडच्या मंत्रीमंडळात स्थान मिळवत तेथे वाहतूक, पर्यटन आणि क्रिडा हे मंत्रीपद तसेच आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा मंत्रीपदावर त्यांनी प्रभावी काम केले. यामुळेच थेट पंतप्रधान पदाचे मुख्य दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. एन्डा केनी यांनी पंतप्रधानपद सोडल्यानंतर लागलेल्या निवडणुकीत लिओ यांचा मुख्य मुकाबला सीमोन कोवनी यांच्याशी आहे. लिओ यांना मिळणारे समर्थन पाहता ते पंतप्रधान झाल्यास आश्‍चर्य वाटू नये अशी राजकीय स्थिती आहे.

लिओ यांचे मुळ घर मालवण तालुक्यातील वराड हे होय. वराडकर कुटुंब हे या गावातील प्रतिष्ठीत मानले जाते. लिओ यांचे वडील अशोक यांचे प्राथमिक शिक्षण वराडलाच झाले. अत्यंत हुशार असलेल्या अशोक यांना त्यांच्या वडिलांनी शिक्षणासाठी मुंबईत नेले पुढे हे कुटुंब मुंबईतच स्थायिक झाले. अशोक यांनी शिष्यवृत्ती मिळवून वैद्यकीय शिक्षणासाठी 1960 मध्ये इंग्लड गाठले. तेथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली. यातच त्यांची ओळख नर्स असलेल्या आयरिश वंशाच्या मिरीअम यांच्याशी झाली. त्या दोघांचा प्रेमविवाह झाला. त्यांना एकूण तीन मुले यातील सानिया आणि सोफिया या लिओ यांच्या मोठ्या बहिणी. ही तिन्ही भावंडे डॉक्टर आहेत. सानिया या तर आयर्लंडमधल्या सगळ्यात मोठ्या रुग्णालयात बालरोगतज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

लिओ यांना तसा फारसा राजकीय वारसा नाही. मात्र देशभक्तीचा खूप मोठा वारसा या कुटुंबाच्या मागे आहे. लिओ यांच्या वडिलांचे काका मधुकर वराडकर आणि मनोहर वराडकर हे स्वातंत्र्य संग्रामात अग्रेसर होते. त्यांनी ब्रिटीशांचे राज्य जावे म्हणून तुरुंगवासही भोगला. योगायोग म्हणजे याच कुटुंबाचा वंश असलेले लिओ आज ब्रिटनचाच (युनायटेड किंगडम) भाग असलेल्या आयर्लंडच्या पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार बनले आहेत.

आयर्लंडमध्ये स्थायिक होवूनही वराडकर कुटुंबाने गावाशी असलेली नाळ तोडलेली नाही. गावात त्यांचे वडीलोपार्जित घर, जमीन जुमला आहे. चारच वर्षापूर्वी त्यांनी नवे टुमदार घरही बांधले. याच्या गृहप्रवेशासाठी लिओ यांचे वडील अशोक आणि त्यांच्या आई मिरीअम आल्या होत्या. हे दाम्पत्य दर दोन वर्षांनी धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने गावाकडे आवर्जुन येते. लिओ हे मात्र अद्याप वराडला आलेले नाहीत. 2011 मध्ये विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने तत्कालीन आयर्लंडचे क्रिडामंत्री या नात्याने लिओ हे भारतात आले होते. यावेळी त्यांनी मुंबईला भेट दिली होती. असे असले तरी या कुटुंबाचा वराडमध्ये असलेल्या आपल्या भाऊबंधांशी नेहमी संपर्क असतो. आता या वराडकर कुटुंबाला लिओ कधी पंतप्रधान बनतात याचे वेध लागले आहेत.

फोटो गॅलरी