मलालाचे 24 तासांत साडेतीन लाख फॉलोअर्स

वृत्तसंस्था
शनिवार, 8 जुलै 2017

जगातील तरुण मुलींचे प्रतिनिधित्व करताना मलालाने सुरू केलेली स्त्री शिक्षणसाठीची चळवळ म्हणजे आपल्याला अपेक्षित जगातील परिवर्तन आहे.
- कमला हॅरिस, अमेरिकेच्या सिनेटर

नवी दिल्ली - पाकिस्तानची नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई हिने ब्रिटनमधील बर्मिगहॅम येथून पदवीचे शिक्षण शुक्रवारी पूर्ण केले. त्यानंतर लगेचच तिने ट्‌विटरवर प्रथमच अकाउंट सुरू केले असून, "मायक्रोसॉफ्ट'चे संस्थापक बिल गेट्‌स व कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडेवू यांनी तिचे सोशल मीडियाच्या जगात स्वागत केले. गेल्या 24 तासांत तिचे तीन लाख 70 हजार फॉलोअर्स झाले आहेत.

मुलींना शिकण्यास बंदी असतानाही शाळेत जाण्याचे धाडस केल्याबद्दल तालिबान्यांच्या हल्ल्याला सामोरे जावे लागलेल्या मलालाने काल ट्विटरवर प्रवेश करतानाच अभिवादनाचे ट्विट सर्व प्रथम केले. तिने लिहिले आहे, की आज माझा शाळेचा शेवटचा दिवस व ट्विटरवरील पहिला दिवस आहे. बिल गेट्‌स, ट्रुडेवू यांच्यासाख्या प्रसिद्ध व्यक्ती व संस्थांनी शांततेचे नोबेल पारितोषिक विजेत्या मलालाचे स्वागत केले. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्याबद्दल ट्रुडेवू यांनी तिचे अभिनंदन केले. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी मलालाची भेट घेतली होती. "प्रेरणास्थान' असे तिचे वर्णन बिल गेट्‌स यांनी केले आहे. "ट्विटरसाठी आजचा दिवस अधिक तेजस्वी असेल,' अशी पोस्ट तिच्या एका फॉलोअरने केली आहे.

ट्विटरवर आगमन करतानाच मलालाने सात ट्विट पोस्ट केल्या आहेत. "जगातील स्त्री शिक्षणासाठीचा आपला लढा यापुढेही सुरूच राहील', असे तिने एका ट्विटमध्ये म्हटले आहे. मलाला या महिन्यात विसावा वाढदिवस साजरा करणार आहे. "गर्ल पॉवर ट्रिप' ही आपली मोहीम सुरू ठेवणार असून, पुढील आठवड्यात लॅटिन अमेरिका, आफ्रिका व मध्य-पूर्वेकडील देशांना भेट देणार असल्याचेही तिने ट्विटरवर सांगितले.
मलाला पाकिस्तानमधील वायव्य भागात मिंगोरा या गावची मूळ रहिवासी आहे. तेथे मुलींना शिकण्यास बंदी असतानाही शाळेत जाण्याचे धाडस केल्याबद्दल तालिबान या दशतवादी संघटनेने तिच्यावर 2012मध्ये जीवघेणा हल्ला केला होता. त्यात गंभीर जखमी झालेली मलाला सुदैवाने बचावली. स्त्री शिक्षणाच्या लढ्यासाठी शांततेचे नोबेल पारितोषिक देऊन 2014 मध्ये तिचा सन्मान करण्यात आला होता.

जगातील तरुण मुलींचे प्रतिनिधित्व करताना मलालाने सुरू केलेली स्त्री शिक्षणसाठीची चळवळ म्हणजे आपल्याला अपेक्षित जगातील परिवर्तन आहे.
- कमला हॅरिस, अमेरिकेच्या सिनेटर