प्रादेशिक शांततेला भारताकडून धोका

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मार्च 2017

पाकिस्तानचा कांगावा; काश्‍मीरप्रश्‍नी चर्चेची तयारी

इस्लामाबाद: भारत- पाकिस्तान संबंधातील वादग्रस्त मुद्दा असलेला काश्‍मीर प्रश्‍न हा फाळणीतील अपूर्ण भाग आहे. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी भारताशी चर्चा करण्याची तयारी आहे; मात्र, सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारत प्रादेशिक शांततेला धोका निर्माण करीत आहे, असा कांगावा पाकिस्तानचे अध्यक्ष मामनून हुसेन यांनी गुरुवारी केला.

पाकिस्तानच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज सैन्यदलाचे संचलन झाले. यंदा प्रथमच यात चीन, सौदी अरेबिया या देशांमधील सैन्याने सहभाग घेतला. पाकिस्तानने विकसित केलेल्या स्वदेशी क्षेपणास्त्र व हवाई बचाव यंत्रणेचे प्रदर्शन संचलनात करण्यात आले. या कार्यक्रमाला हुसेन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, ""आम्हाला संपूर्ण जगाशी विशेषतः शेजारील देशांशी मैत्रीचे व शांततेचे संबंध हवे आहेत; पण भारताची बेजबाबदार कृत्ये आणि शस्त्रसंधीचा भंग यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षेला धोका पोचत आहे.''

संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या ठरावानुसार काश्‍मीर प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी आम्ही भारताशी चर्चा करण्यास तयार आहोत, असे सांगताना जम्मू-काश्‍मीरमधील जनतेच्या स्वनिर्णयाचा अधिकाराला पाकिस्तानचा नैतिक, राजकीय व राजनैतिक पाठिंबा कायम असेल, याचा पुनरुच्चार हुसेन यांनी केला. ""पाकिस्तानची बचाव यंत्रणा अभेद्य आहे. जागतिक आणि प्रादेशिक पातळीवर शांततेसाठी देशाचे आण्विक सामर्थ्य वाढविण्यात येत आहे. देशाची अर्थव्यवस्था बळकट आहे. कोणत्याही राष्ट्राबाबत पाकिस्तानी भूमिका आक्रमक नाही, पण प्रादेशिक शांतता व स्थैर्य राखावे यासाठी आम्ही आग्रही आहोत. अनेक वर्षांपासून पाकिस्तान दहशतवादाशी लढत आहे. यामुळे सैन्यदल व अन्य कायदे संस्थांना मोठा त्याग करावा लागला आहे. या त्यागामुळेच पाकिस्तान पूर्वीपेक्षाही आज जास्त सुरक्षित आहे,'' असेही ते म्हणाले.
हुसेन यांच्यासह पंतप्रधान नवाझ शरीफ, मंत्री, राजकीय नेते, राजनैतिक अधिकारी व तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते. दक्षिण आशियात मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश निर्माण करण्याच्या प्रयत्नासाठी 1940 मध्ये ऐतिहासिक लाहोर करार झाला. त्याप्रीत्यर्थ पाकिस्तानमध्ये प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो.

Web Title: mamnoon hussain talk about india-pakistan