'प्लेबॉय'चे संस्थापक ह्यूज हेफ्नर यांचे निधन

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

महिन्याला 70 लाख एवढ्या प्रतींचा खप झाल्याचा विक्रम या मासिकाने नोंदवला.

बेव्हर्ली हिल्स : 'प्लेबॉय' या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रौढांसाठीच्या प्रसिद्ध मासिकाचे संस्थापक ह्यूज हेफ्नर यांचे बुधवारी निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. 

प्लेबॉय एंटरप्रायजेस इनकॉर्पोरेशनने बुधवारी हेफनर यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. 

हेफ्नर यांनी 1953 मध्ये घरातूनच प्लेबॉय प्रकाशित करायला सुरवात केली. पुढे ते प्रौढांचे सर्वाधिक खपाचे मासिक बनले. महिन्याला 70 लाख एवढ्या प्रतींचा खप झाल्याचा विक्रम या मासिकाने नोंदवला. अलीकडच्या काळातील इंटरनेटच्या वेगवान प्रसारामुळे प्लेबॉयचा चेहरामोहरा बदलून एक प्रकारे माध्यमांतर झाले. वृत्तपत्रविक्रेत्यांच्या दुकानांपेक्षा हे मासिक ऑनलाईन अधिक वाचले जाऊ लागले. 

हेफ्नर यांची आठवण अनेकांना येत राहील, असे त्यांचे पुत्र कुपर हेफ्नर यांनी सांगितले. 'माध्यम आणि संस्कृतीमध्ये अपवादात्मक आणि परिणामकारक असे हेफ्नर यांचे जीवन होते. ते मुक्त विचार, नागरी अधिकार आणि लैंगिक स्वातंत्र्याचे ते पुरस्कर्ते होते,' अशा शब्दांत कुपर यांनी वडिलांना श्रद्धांजली वाहिली.