ट्रम्प यांच्यावर दबाव टाकणार

पीटीआय
शनिवार, 8 जुलै 2017

जागतिकीकरणाला विरोध करणाऱ्या निदर्शकांनी आज भांडवलशाही देशांचा सहभाग असलेल्या या परिषदेपूर्वी तीव्र निदर्शने केली. या निदर्शकांनी अनेक ठिकाणी रस्ते अडवून पोलिस वाहने पेटवून दिली. काही निदर्शकांनी पोलिसांच्या दिशेने पेट्रोल बॉंबही फेकले. निदर्शनांमध्ये साधारणपणे बारा हजार लोक सहभाही होते. यावेळी झालेल्या संघर्षात 75 पोलिस जखमी झाले.

हॅम्बर्ग : मुक्त व्यापार, दहशतवाद आणि तापमानवाढ हा मुख्य अजेंडा असलेल्या जी-20 परिषदेस आज जर्मनीमध्ये सुरवात झाली. या परिषदेसाठी अमेरिका, रशिया, भारत, चीन यांच्यासह प्रमुख देशांचे प्रमुख उपस्थित असून पॅरिस पर्यावरण करार नाकारणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एकत्रित दबाव टाकण्याचा प्रयत्न यावेळी होणार आहे. 

जी-20 निमित्त ब्रिक्‍स गटाचीही आज अनौपचारिक बैठक होऊन यातही पर्यावरणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. पॅरिस पर्यावरण करार ही अत्यंत महत्त्वाची घटना असून सार्वमताने घेतलेला हा निर्णय असल्याने त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे. पॅरिस करार नाकारण्याच्या आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहन जी-20 गटातर्फे अमेरिकेला करणार असल्याचे ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आज सांगितले. 

हिंसक निदर्शने 
दरम्यान, जागतिकीकरणाला विरोध करणाऱ्या निदर्शकांनी आज भांडवलशाही देशांचा सहभाग असलेल्या या परिषदेपूर्वी तीव्र निदर्शने केली. या निदर्शकांनी अनेक ठिकाणी रस्ते अडवून पोलिस वाहने पेटवून दिली. काही निदर्शकांनी पोलिसांच्या दिशेने पेट्रोल बॉंबही फेकले. निदर्शनांमध्ये साधारणपणे बारा हजार लोक सहभाही होते. यावेळी झालेल्या संघर्षात 75 पोलिस जखमी झाले. 

तणावाच्या पार्श्‍वभूमीवरील भेटी 

  • नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट 
  • रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रथमच भेट 
  • मानवाधिकार भंगावरून शाब्दिक वाद सुरू असताना जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल आणि तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांची भेट