'बिग डॅडी' मुगाबेंचा अस्त (विजय नाईक)

'बिग डॅडी' मुगाबेंचा अस्त (विजय नाईक)

झिंबाब्वेचे 93 वर्षांचे हुकूमशहा व अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांना तब्बल 37 वर्षांच्या कारकीर्दीनंतर काल अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी राजीनाम्यानंतर पत्नी राबडी देवीला जसे मुख्यमंत्री केले, तसे मुगाबे यांना पत्नी ग्रासा यांना अध्यक्ष करून मागच्या दाराने हुकूमशाही कायम चालवावायाची होती. परंतु, ते करू शकले नाही. आता सत्तासूत्रे त्यांचे विरोधक व माजी उपाध्यक्ष इमरसन एमनान्‌गाग्वा यांच्या हाती जाण्याची शक्‍यता असून, झिंबाबवेचे माजी पंतप्रधान मॉर्गन स्वांगिराय यांनी सत्ताबदलाबाबत समाधान व्यक्त केले आहे. 

आफ्रिकेकडे पाहता असे दिसून येते की या खंडात पारतंत्र्यात असलेले देश 1950 च्या दशकापासून स्वतंत्र होण्यास सुरूवात झाली. पण 1980 मध्ये वसाहतवादाचा शेवट होऊन झालेल्या निवडणुकात क्रांतिकारी मुगाबे यांच्या झानू -पीएफ (झिंबाबवे आफ्रिकन नॅशनल युनियन व पॅट्रिऑटिक फ्रन्ट) ला बहुमत मिळून ते सत्तेवर आले. तेव्हापासून गेल्या आठवड्यात त्यांचाविरूद्ध झालेल्या लष्करी उठावापर्यंत ते सत्तेवर होते. हरारेमधील त्यांच्या निवासस्थानी लष्कराने त्यांना स्थानबद्ध केल्यानंतरही ते अध्यक्षपद सोडावयास तयार नव्हते. पुढील महिन्यात पक्षाचे अधिवेशन होणार असून, त्यात त्याना पुन्हा स्वतःच्या नावावर शिक्कामोर्तब करून घ्यावयाचे होते. परंतु, लष्कर व संसद तयार तयार नव्हती. त्यांच्या विरूद्ध दोषारोप (इम्पीचमेन्टची) प्रक्रिया सुरू होऊन त्यावर चर्चा चालू असताना त्यांनी राजीनामा दिला. हरारे व अन्य शहरात जल्लोषाचे वातावरण असून, मुगाबे यांची जुलमी कारकीर्द संपुष्टात आली याबाबत समाधान व्यक्त होत आहे. दिल्लीत 2015 मध्ये झालेल्या भारत-आफ्रिका फोरमच्या तिसऱ्या शिखर परिषदेला उपस्थित राहाण्यासाठी मुगाबे आले होते. 

आफ्रिकेत प्रदीर्घकाळ सत्तेवर असलेल्या हुकूमशहांना 'बिग डॅडी' म्हटले जाते. 'आफ्रिका न्यूज'नुसार 2015 अखेर आफ्रिकेत 30 वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक सत्तेवर असलेले सहा हुकूमशहा आहेत. त्यांच्या कारकीर्दीची वर्षे एकत्र केल्यास ते तब्बल 201 वर्षे सत्तेत असल्याचे दिसते. त्यात मुगाबे यांच्यासह इक्वेटोरियल गिनीचे तिओडोरो एम्बासोगो (38 वर्षे), कॅमेरूनचे पॉल बिया (33 वर्षे), कॉंगो गणराज्याचे डेनिस एनगुएसो, (31) वर्षे, युगांडाचे योवेरी मुसेवेनी (30 वर्षे) व अंगोलाचे जोसे एदुआर्द सॅन्टोस (36 वर्षे) या अध्यक्षांचा समावेश होतो. यापूर्वी लीबियाचे मुअम्मर गड्डाफी तब्बल 42 वर्षे सत्तेवर होते. त्यापैकी फक्त अंगोलाचे अध्यक्ष जोसे एदुआर्द सॅन्टोस यांनी मार्च 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर जो लारेंको यांच्या हाती अध्यक्षपदाची सूत्रे दिली. 

झिंबाबवेचे (पूर्वाश्रमीचा दक्षिण ऱ्होडेशिया) मुगाबे (झानू -पीएफ) व त्यांचे सहकारी जोशुआ एन्कोमो (झापू- झिम्बाबवे आफ्रिकन पिपल्स युनियन) यांनी वसाहतवादाविरूद्ध 1953 पासून जोरदार लढा दिला. त्याची तुलना दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेला व त्यांचे सहकारी थाबो एम्बेकी आदींशी करता येईल. मंडेला 27 वर्षे तर मुगाबे दहा वर्षे तरूंगात होते. त्यांनीही आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेसच्या 'उमखुंटो वी सीझवे' (स्पीयर ऑफ द नेशन-सशस्त्र लढा देण्यासाठी स्थापन केलेली संघटना) प्रमाणे 'झानू गोरीला सेना' स्थापन करून मोझांबिकमधून वसाहतवादी सरकारविरूद्ध सशस्त्र लढा दिला. पण सत्तासूत्रे हाती आल्यापासून सहकारी एन्कोमो वरचढ होऊ नये, म्हणून त्यांची बदनामी करणे सूरू केले. पुढे त्यांच्या व त्यांच्या झापू पक्षाच्या कार्यकर्त्याना संपुष्टात आणण्यासाठी '5- ब्रिगेड' ही गोपनीय संघटना स्थापून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. त्यात हजारो लोक ठार झाले. त्यात माताबेलेलॅंडमध्ये सातत्याने काही वर्षे चालविलेल्या विरोधकांच्या शिरकाणाचा समावेश होतो. जेव्हा जेव्हा लोकशाही मार्गाने मुगाबे यांना पदच्युत करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा, तेव्हा मुगाबे सांगत होते, ''मला केवळ परमेश्‍वरच सत्तेरून खाली खेचू शकतो'' (ओनली गॉड कॅन रिमूव्ह मी) ते स्वतःलाच इश्‍वर मानायचे व ''सत्ता आपला आजन्म अधिकार आहे,'' असे सांगायचे. निवडणुकात विरोधकांच्या बाजूने गेलेल्या कौलाला त्यांनी कधी मानले नाही. 

जनतेसाठी मात्र श्‍वेतवर्णीयांची हुकूमशाही जाऊन एका कृष्णवर्णीयाची हुकूमशाही आली होती. मुगाबे यांनी सत्तेवर आल्यानंतर पहिली काही वर्षे श्‍वेतवर्णीयांना विश्‍वासात घेऊन कारभार चालविल्याने झिंबाबवेत त्यांच्याविरूद्ध हिंसाचार झाला नाही. त्यांना काही प्रमाणात अभय मिळाले. परंतु, जनतेचे दारिद्रय कायम राहिले. श्‍वेतवर्णीयांना त्यांनी सळो की पळो करून सोडले, ते 1990 च्या अखेरीस. श्‍वेतवर्णीयांच्या हाती असलेल्या जमीनी कृष्णवर्णीयांकडे गेल्या. तथापि, त्यांना शेतीचा काही अनुभव नसल्याने धान्योत्पादात मोठी घट झाली. बेकारीचे प्रमाण 80 टक्‍क्‍यांवर जाऊन पोहोचले. चलवाढ झाली. नोव्हेबर 2008 मध्ये ते प्रमाण 79.6 दशलक्ष टक्के होते. परिणमतः 2009 मध्ये झिंबाबवेने नोटा छापणेच बंद केले व अन्य देशांचे चलन वापरणे सुरू केले. 

मुगाबे पर्व कधी संपुष्टात येईल, याची प्रतीक्षा झिंबाबवेतील जनता वर्षानवर्ष करीत आहे. परंतु, आफ्रिकेला शाप आहे, तो तेथे वारंवार होणाऱ्या लष्करी उठावांचा. त्यामुळे, एक सत्ता गेली, की दुसरी येते, व ते संकट त्याहूनही मोठे असते. सत्तेवर राहून स्वतःहून तिचा त्याग करणारे नेल्सन मंडेला कुठे व मुगाबे कुठे! आता, मंडेला यांचेच सहकारी अध्यक्ष जेकब झुमा यांनी सत्ता सोडावी, असा जोर दक्षिण आफ्रिकेत वाढतोय. त्याचप्रमाणे, प्रदीर्घ हुकूमशाही असलेल्या आफ्रिकेतील अन्य राष्ट्रांच्याही आशाही मुगाबे यांच्या सत्ता पालटानंतर पालविल्या, तर आश्‍चर्य वाटायला नको. पण, त्यासाठी झिंबावबेतील सत्तापालटानंतर तेथे खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित होणार काय, याकडे आफ्रिकेचे लक्ष लागेल. आफ्रिका युनियनने झिंबाबवेतील सत्तापालटाचे स्वागत केले आहे. ही संघटना आफ्रिका ंखंडाचा आवज म्हणून ओळखली जाते, म्हणूनच तिची प्रतिक्रीया प्रातिनिधिक स्वरूपाची आहे, असे मानावयास हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com