जग वाचवणारा माणूस नकळत जग सोडून गेला...

टीम ई सकाळ
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

साधारण 23 मिनिटांनी माझ्या लक्षात आले की काहीच घडलेले नाही. उपग्रहांनी दिलेली सूचना खरी असती, तर आतापर्यंत सर्व काही नष्ट व्हायला हवे होते. तसे झाले नाही. मी सुटकेचा निःश्वास सोडला...

- स्टॅनिस्लाव्ह पेट्रोव्ह

स्टॅनिस्लाव्ह पेट्रोव या नावाचा आणि आपला थेट काही संबंध नाही. पण, कदाचित या पृथ्वीवर आपण अस्तित्वात आहोत, यामागे स्टॅनिस्लाव्ह कारणीभूत आहेत. 'जगाला वाचविणारा माणूस' म्हणून गेली 34 वर्षे लष्करी जगतात प्रसिद्ध असणाऱया स्टॅलिस्लाव्ह यांनी आज, 19 मे रोजी जगाचा अखेरचा निरोप घेतल्याचे गेल्या 24 तासांत जगाला समजले. 

स्टॅनिस्लाव्ह तत्कालिन सोव्हिएत रशियाच्या लष्करातील लेफ्टनंट कर्नल दर्जाचे अधिकारी. 26 सप्टेंबर 1983 ची ती रात्र न जाणो पृथ्वीवरच्या मानवजातीवरचे संकट होते. अमेरिका आणि सोव्हिएत रशियातील शीत युद्ध शीगेला पोहोचण्याचा तो काळ होता. क्षेपणास्त्र हल्ल्याची सूचना देणाऱया दक्षिण मॉस्कोमधील आपल्या कार्यालयात स्टॅनिस्लाव्ह ड्युटीवर होते. अमेरिकेने आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागले, तर त्याची सूचना या कार्यालयाला पहिल्यांदा मिळेल, अशी सोव्हिएत महासंघाची लष्करी व्युहरचना होती. अचानक स्टॅनिस्लाव्ह यांच्या कार्यालयातील संगणक धडाधड संदेश देऊ लागला.

असे संदेश येणे याचा दुसरा अऱ्थ सोव्हिएत साम्राज्याच्या उपग्रहांनी अमेरिकेने डागलेले आंतरखंडीय क्षेपणास्त्र मॉस्कोच्या दिशेने येत असल्याची सूचना दिल्यासारखे होते. क्षेपणास्त्राच्या रॉकेट इंजिनमधून बाहेर पडणाऱया उष्णतेचे मोजमाप करून त्यानुसार रशियन सैन्याला अॅलर्ट करण्याची व्यवस्था उपग्रहांमध्ये बसवली होती. ओको क्रमांक 5 हा उपग्रह रशियाने लष्करी टेहळणीसाठी सोडलेल्या उपग्रहांच्या मालिकेतील सर्वात नवा गडी. स्टॅनिस्लाव्ह यांच्या कार्यालयातील सर्पुकोव्ह-15 या कॉम्प्युटवर याच उपग्रहाने आंतरखंडीय हल्ल्याची सूचना देणारा संदेश धाडला होता. 

कुठलाही संदेश पुन्हा पुन्हा पडताळून पाहण्याची आवश्यकता स्टॅनिस्लाव्ह यांना माहिती होती. मात्र, त्या रात्री ओको क्रमांक 5 ने 'तीव्र विश्वासार्ह' स्वरुपाचा संदेश दिल्यामुळे स्टॅनिस्लाव्ह यांच्या पायाखालची जमीन सरकली. या लेफ्टनंट कर्नलने सारासार विवेकबुद्धी वापरली. एक आंतरखंडीय क्षेपणास्त्र रशियावर डागून आण्विक युद्ध सुरू करण्याएवढी अमेरिका मुर्ख नाही, असा स्वतःशीच निर्णय घेतला. स्टॅनिस्लाव्ह आपल्या वरीष्ठांकडे गेले आणि तत्काळ आपल्याकडे असलेली माहिती सादर केली. हल्ल्याची सूचना चुकीची असल्याचे स्टॅनिस्लाव्ह वरीष्ठांना पटवून देत असतानाच एक नव्हे पाच क्षेपणास्त्र डागली गेली असल्याचा संदेश समोर आला. 

एका क्षणी अंतर्मनाच्या हाकेला ओ देत स्टॅनिस्लाव्ह यांनी वरीष्ठांना सांगितले, 'हल्ल्याच्या सर्व सूचना चुकीच्या आहेत.'

अमेरिकेच्या कथित हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सोव्हिएट रशियाने हल्ला केला असता...त्यावर अमेरिकेने सोव्हिएट रशियावर हल्ला केला असता आणि जग विनाशाच्या गर्तेत खोल खोल फेकले गेले असते. 

'माझ्यासमोर असलेली माहिती दाखवत होती की अमेरिकेने क्षेपणास्त्र डागली आहेत. हा रिपोर्ट मी सर्वोच्च अधिकाऱयांना थेट पाठवला असता, तर मला कोणीही काही बोलले नसते. समोर असलेल्या फोनपर्यंत पोहोचणे इतकेच मला करायचे होते. सर्वोच्च अधिकाऱयांना थेट माहिती देण्याचे माझे काम होते. पण, मी जागेवरून हलू शकलो नाही. एखाद्या तापलेल्या तव्यावर घट्ट बसवून ठेवावे, अशी माझी अवस्था झाली होती...,' स्टॅनिस्लाव्ह यांनी काही वर्षांनंतर 'बीबीसी'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. 

प्रशिक्षणात शिकवलेले सारे विसरून स्टॅनिस्लाव्ह यांनी आपल्याच कार्यालयातील वरीष्ठांना गाठले आणि उपग्रहाकडून चुकीचे संदेश येत असल्याचा दावा केला. हा दावा चुकीचा असता, तर काही मिनिटांतच स्टॅनिस्लाव्ह यांच्या कार्यालयाचा परिसर, मॉस्को शहर आण्विक हल्ल्याला बळी पडले असते. 

'साधारण 23 मिनिटांनी माझ्या लक्षात आले की काहीच घडलेले नाही. उपग्रहांनी दिलेली सूचना खरी असती, तर आतापर्यंत सर्व काही नष्ट व्हायला हवे होते. तसे झाले नाही. मी सुटकेचा निःश्वास सोडला...', स्टॅनिस्लाव्ह यांनी मुलाखतीत सांगितले होते. 

यथावकाश या प्रकरणाची चौकशी झाली. सोव्हिएटच्या उपग्रहांनी सूर्यकिरणांच्या ढगातून होणाऱया परावर्तनाला आंतरखंडीय क्षेपणास्त्र समजून धोक्याची सूचना दिली असल्याचे उघड झाले. जग विनाशापासून वाचविणाऱया स्लॅनिस्लाव्ह यांच्याबद्दल अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली. 

स्टॅनिस्लाव्ह कालांतराने प्रसिद्धीपासून दूर गेले. त्यांच्याबद्दल कोणालाच काही ठावठिकाणा नव्हता. जर्मन चित्रपट निर्माते कार्ल शुमाकर यांच्यामुळे त्यांच्या निधनाचे वृत्त जगासमोर आले. शुमाकर यांनी स्टॅनिस्लाव्ह यांच्यावर चित्रपट काढला आहे. 7 सप्टेंबरला स्टॅनिस्लाव्ह यांचा वाढदिवस. त्यानिमित्त शुभेच्छा द्यायला शुमाकर यांनी स्टॅनिस्लाव्ह यांच्या घरी फोन केला, तेव्हा त्यांचा मुलगा दिमित्र पेट्रोव याने वडिलांचे 19 मे रोजी निधन झाल्याची माहिती दिली. 

शुमाकर यांनी याबद्दलची घोषणा सोशल मीडियावर केली आणि पाहता पाहता जगभरातील प्रसार माध्यमांपर्यंत स्टॅनिस्लाव्ह यांच्या निधनाचे वृत्त पोहोचले. 
 

Web Title: Marathi news Stanislav Petrov averted possible nuclear war dies