मेक्‍सिकोचा फटाका बाजार आगीत खाक; 31 ठार

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

मेक्‍सिको : मेक्‍सिको शहरातील सर्वांत मोठ्या फटाका बाजाराला बुधवारी लागलेल्या भीषण आगीत 31 जण ठार झाले, तर 72 नागरिक जखमी झाले. फटाक्‍यांचा हा बाजार आगीत नष्ट होण्याची गेल्या 11 वर्षांतील ही तिसरी घटना आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्‍यात आणली.

मेक्‍सिको : मेक्‍सिको शहरातील सर्वांत मोठ्या फटाका बाजाराला बुधवारी लागलेल्या भीषण आगीत 31 जण ठार झाले, तर 72 नागरिक जखमी झाले. फटाक्‍यांचा हा बाजार आगीत नष्ट होण्याची गेल्या 11 वर्षांतील ही तिसरी घटना आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्‍यात आणली.

उत्तर मेक्‍सिकोपासून 32 किमीवर असलेल्या ट्युल्टेपेक या उपनगरात सॅन पॅबलिटो येथील फटाका बाजारात भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास आगीचा आगडोंब उसळला. नाताळ व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फटाके खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी होती. याच वेळी आग लागून फटाक्‍यांचे रंगीबेरंगी स्फोट होऊ लागले. यामुळे सर्वत्र धुराचे मोठे लोळ उठले. ""बाजारात एकच हलकल्लोळ उडाला. लोक सैरावैरा धावत होते,'' असे ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या वॉल्टर गरड्युनो यांनी सांगितले.
स्फोटात 26 जण जागीच ठार झाले. पाच जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला, असे मेक्‍सिकोचे मुख्य वकील अलेजांद्रो गोमेझ यांनी सांगितले. जळालेल्या अवस्थेतील मृतदेहांवरून ओळख पटणे शक्‍य नसल्याने न्यायवैद्यक तज्ज्ञांकडून त्याचे आनुवांशिक पृथक्करण करण्यात येत असल्याची माहिती मेक्‍सिकोचे राज्यपाल एरुव्हिएल अव्हिला यांनी येथील एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. आगीत 72 जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारानंचर त्यांपैकी 21 जणांना घरी सोडण्यात आले.

"आग लागल्यांनतर बाजारातील सर्व फटाके फुटल्यानंतर अग्निशामक दलाला आग विझविण्याचे प्रयत्न सुरू करता आले. बाजारात फटाक्‍यांचे 300 स्टॉल होते. ते सर्व आगीत खाक झाले,'' असे नागरी सुरक्षा सेवेचे प्रमुख लुईस फेलिप प्युन्टे यांनी सांगितले. जखमींची स्थिती नाजूक असून, मृतांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्‍यता त्यांनी व्यक्त करीत ते म्हणाले, सर्वनाश झाल्यानंतर जे चित्रण चित्रपटात पाहावयास मिळते, तशी परिस्थिती घटनास्थळी होती.''

अल्पवयीने मुले भाजली
जखमींपैकी 13 अल्पवयीन मुले 90 टक्के भाजले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. "या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल आणि हल्ल्यातील पीडितांना आर्थिक मदत करण्यात येईल', अशी ग्वाही मेक्‍सिकोचे राज्यापाल एरुव्हिएल अव्हिला यांनी दिली.

भीषण आगीत मरण पावलेल्या कुटुंबीयांचे मी सांत्वन करतो. जखमींना लवकर बरे वाटावे, यासाठी प्रार्थना करतो.
इन्‍रिक पेना न्यूटो, अध्यक्ष, मेक्‍सिको