इस्राईल: मोदींचे निवासस्थान "पृथ्वीवरील सर्वांत सुरक्षित' निवासस्थान !

वृत्तसंस्था
बुधवार, 5 जुलै 2017

या प्रसिद्ध हॉटेलचे व्यवस्थापकीय संचालक शेल्डन रिट्‌झ यांनी "बॉंबहल्ला, रासायनिक शस्त्रास्त्रे वा इतर कोणत्याही घातक हल्ल्यापासून मोदी पूर्णत: सुरक्षित' असल्याचे सांगितले

जेरुसलेम - सध्या इस्राईलच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवासस्थान (सूट) हे या "जगातील सर्वांत सुरक्षित' निवासस्थान असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मोदी हे जेरुसलेममधील जगप्रसिद्ध "किंग डेव्हिड' हॉटेलमध्ये उतरले आहेत. या प्रसिद्ध हॉटेलचे व्यवस्थापकीय संचालक शेल्डन रिट्‌झ यांनी "बॉंबहल्ला, रासायनिक शस्त्रास्त्रे वा इतर कोणत्याही घातक हल्ल्यापासून मोदी पूर्णत: सुरक्षित' असल्याचे सांगितले. रिट्‌झ यांच्याकडेच पंतप्रधान मोदींच्या संपूर्ण दौऱ्याच्या व्यवस्थापनाचीही प्रमुख जबाबदारी आहे. ""जर सर्व हॉटेलवर बॉंबहल्ला करण्यात आला; तरी पंतप्रधानांचे निवासस्थान सुरक्षित राहिल,'' असे रिट्‌झ म्हणाले.

"या शतकामधील सर्व अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवासाची सोय आम्ही केली आहे. तीन आठवड्यांपूर्वी आमच्या याच हॉटेलमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेदेखील उतरले होते. आता आम्ही मोदी यांचे यजमान आहोत,'' असे रिट्‌झ म्हणाले. मोदी शाकाहारी असल्याचे ध्यानी घेऊन हॉटेल प्रशासनातर्फे त्यांच्या निवासस्थानामधील पदार्थ हे पूर्णत: शाकाहारी व शर्कराविरहित असल्याची खात्री करुन घेण्यात आली आहे. याचबरोबरील येथील फुलांच्या सजावटीसही भारतीय शिष्टमंडळाची मान्यता मिळविण्यात आली आहे.

भारतीय पंतप्रधानांच्या यांच्या वैशिष्ट्यपूर्ण निवासस्थानास विशेष स्वयंपाकघरही जोडण्यात आले आहे. ""मोदी हे गुजराती अन्नपदार्थ सेवन करत असावेत, असा माझा अंदाज आहे. भारतीय पंतप्रधानांना आवश्‍यक असलेले अन्नपदार्थ तयार करण्यासाठी लागणारेसर्व घटक स्वयंपाकघरात असल्याची खात्री करुन घेण्यात आली आहे. हे अन्नपदार्थ "मसालापूर्ण' आहेत! गेल्या काही दिवसांपासून आमच्या हॉटेलमध्ये या अन्नपदार्थांचा सुगंध पसरला आहे,'' असे रिट्‌झ म्हणाले.

सुरक्षेच्या बाबतीतही आम्ही "सर्वोत्कृष्ट' आहोत, असे रिट्‌झ यांनी अभिमानाने सांगितले!