श्रीलंकेत मुसळधार पावसामुळे किमान 25 मृत्युमुखी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 मे 2017

हे संकट आणखी गंभीर होऊ शकते, असा इशाराही श्रीलंकेमधील गृहमंत्रालयाकडून देण्यात आला आहे. नद्यांजवळ राहणारे नागरिक व भूस्खलनाचा धोका असलेल्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे

कोलंबो - श्रीलंकेच्या दक्षिण व पश्‍चिम भागांमध्ये जोरदार झालेल्या पावसानंतर पूर व दरडी कोसळून किमान 25 मृत्युमुखी पडल्याची माहिती येथील सरकारने आज (शुक्रवार) दिली. या नैसर्गिक संकटामुळे पाऊण लाखापेक्षाही जास्त नागरिक प्रभावित झाले आहेत. पावसामुळे ओढविलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये किमान 42 जण बेपत्ता असल्याचे निष्पन्न झाले आहे.

हे संकट आणखी गंभीर होऊ शकते, असा इशाराही श्रीलंकेमधील गृहमंत्रालयाकडून देण्यात आला आहे. नद्यांजवळ राहणारे नागरिक व भूस्खलनाचा धोका असलेल्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या दोन तीन दिवसांपासून श्रीलंकेत होत असलेल्या मुसळधार वृष्टीमुळे राजधानी कोलंबोपासून सुमारे 90 किमी अंतरावर असलेल्या सबरागामुवा प्रांतामध्ये पूरस्थिती उद्‌भविली असून या भागामधील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. दक्षिण श्रीलंकेमध्येही पूराचा फटका बसला आहे. श्रीलंकेच्या नौदलाकडून मदतकार्य राबविण्यात येत आहे. गेल्या मे महिन्यामध्येही मध्य श्रीलंकेमध्ये दरड कोसळून 100 पेक्षाही जास्त नागरिक प्राणास मुकले होते.

टॅग्स