हे कृत्य पाकिस्तानचेच;आमच्याकडे पुरावा:भारत

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

हे कृत्य पाकिस्तानी सैन्यानेच केल्याचा पुरावा आमच्याकडे आहे. पाकिस्तानी सैन्यामधील ज्यांनी हे कृत्य केले असेल; त्यांना कडक शासन करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे

नवी दिल्ली - भारतीय लष्कराच्या दोन जवानांच्या मृतदेहांची विटंबना पाकिस्तानी सैन्यानेच केली असल्याचा सबळ पुरावा भारताकडे असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गौतम बगळे यांनी आज (बुधवार) दिली.

"हे कृत्य पाकिस्तानी सैन्यानेच केल्याचा पुरावा आमच्याकडे आहे. पाकिस्तानी सैन्यामधील ज्यांनी हे कृत्य केले असेल; त्यांना कडक शासन करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे,'' असे बगळे म्हणाले. आज सकाळी अब्दुल बसित या पाकिस्तानी उच्चायुक्तांस समन्स धाडून भारताकडून या प्रकरणाचा कठोर शब्दांत निषेध नोंदविण्यात आला. पाकिस्तानकडून भारताचे हे आरोप खोटे असल्याचा कांगावा करण्यात आला आहे.

पाकिस्तानी लष्कराने भारतीय लष्कराच्या एका आणि सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला प्रत्यक्ष ताबारेषेजवळ मारून त्यांचे शीर कापल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या भ्याड कृत्याला सडेतोड उत्तर देण्याचा निर्धार भारतीय सैन्याने केला आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कामर जावेद बाजवा यांनी नुकतीच प्रत्यक्ष ताबारेषेलगतच्या काही भागांना भेट दिली होती. त्यांनी काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यांनंतर दुसऱ्या दिवशी हा भ्याड हल्ला करण्यात आला.