रोहिंग्या प्रश्‍न सोडविण्यासाठी "वेळ व जागा" द्या...

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

म्यानमारमधील किमान 66 हजार रोहिंग्या मुस्लिमांनी येथील सैन्याकडून अत्याचार केले जात असल्याचा आरोप करत शेजारील बांगलादेशमध्ये धाव घेतली आहे.

नायपिदाव्ह - म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिम अल्पसंख्यांकांसंदर्भात निर्माण झालेली समस्या सोडविण्यासाठी "वेळ व जागा' आवश्‍यक असल्याचे मत म्यानमारचे उप सैन्यप्रमुखांनी व्यक्‍त केले आहे. म्यानमारमधील राखिन प्रांतामध्ये रोहिंग्यांविरोधात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्याची जाणीव असल्याचे रिअर ऍडमिरल म्यिंत न्वे यांनी सिंगापूरमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितले. या समस्येवर तोडग्याबरोबरच गुन्हेगारांना शासनही केले जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

म्यानमारमधील किमान 66 हजार रोहिंग्या मुस्लिमांनी येथील सैन्याकडून अत्याचार केले जात असल्याचा आरोप करत शेजारील बांगलादेशमध्ये धाव घेतली आहे. रोहिंग्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीसंदर्भात म्यानमारवर अनेक वेळा जागतिक पातळीवरुन टीका करण्यात आली आहे. बौद्धधर्मीयांची बहुसंख्या असलेल्या म्यानमारमध्ये रोहिंग्या हे शेजारील बांगलादेशमधून आलेले बेकायदेशीर निर्वासित असल्याचे मानले जाते. या पार्श्‍वभूमीवर न्वे यांनी यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे.