गांधी, नेहरू, आंबेडकर "एनआरआय': राहुल गांधी

वृत्तसंस्था
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

जगाचा अनुभव घेऊन भारतात बदल घडविला

न्यूयॉर्क: "महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्यासारखे स्वातंत्र्य चळवळीचे मोठे नेते हे "अनिवासी भारतीय' होते. त्यांनी जगाचा अनुभव घेऊन भारतात बदल घडविण्याचा प्रयत्न केला,' असे मत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज येथे केले.

जगाचा अनुभव घेऊन भारतात बदल घडविला

न्यूयॉर्क: "महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्यासारखे स्वातंत्र्य चळवळीचे मोठे नेते हे "अनिवासी भारतीय' होते. त्यांनी जगाचा अनुभव घेऊन भारतात बदल घडविण्याचा प्रयत्न केला,' असे मत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज येथे केले.

राहुल गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात येथील भारतीयांच्या सभेला उद्देशून त्यांनी भाषण केले. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी सुमारे दोन हजार भारतीय उपस्थित होते, असे सूत्रांनी सांगितले. "मूळ कॉंग्रेसची चळवळ ही "एनारआय' चळवळच होती. महात्मा गांधी अनिवासी भारतीय होते, जवाहरलाल नेहरू इंग्लंडहून आले होते. डॉ. आंबेडकर, मौलाना आझाद, सरदार पटेल हे सर्व एनआरआय होते. यातील प्रत्येक नेता देशाबाहेर गेला आणि त्यांनी भारताबाहेरील जग पाहिले. हे पाहताना त्यांना भारतासाठी म्हणून काही कल्पना सुचल्या. भारतात येऊन त्यांनी या कल्पनांची अंमलबजावणी केली आणि भारतात बदल घडविला,' असे राहुल म्हणाले.

भारतात असे हजारो "एनआरआय' होऊन गेले असून त्यांच्या योगदानाची अद्याप दखल घेतली गेलेली नाही, असे सांगत राहुल यांनी डॉ. वर्गीस कुरियन यांचे उदाहरण दिले. कुरियन यांच्यासारख्या "अनिवासी भारतीया'ने अमेरिकेतून येऊन भारतात दुग्धक्रांती घडवून आणल्याचे राहुल म्हणाले. "तुम्ही परदेशामध्ये स्थायिक झाला आहात, याचा अर्थ भारताच्या प्रगतीमध्ये योगदान देऊ शकत नाहीत, असे नाही. तुम्ही भारताचा कणा आहात. येथे राहणारा प्रत्येक भारतीय अमेरिकेबरोबरच भारताच्या प्रगतीसाठीही कष्ट करत आहे. काही जण भारताला केवळ भौगोलिक दृष्टीकोनातून पाहतात, मी मात्र या देशाकडे नवनवीन कल्पनांची भूमी म्हणून पाहतो. भारताच्या भल्यासाठी कोणाकडे चांगल्या कल्पना असतील, तर माझ्या दृष्टीने तो भारतीय आहे,' असेही राहुल गांधी म्हणाले.