उत्तर कोरियाकडून संवेदनशील क्षेपणास्त्र चाचणी

पीटीआय
बुधवार, 22 जून 2016

प्योंगयांग - उत्तर कोरियाने आज (बुधवार) या देशाच्या पूर्व सागरी तटाजवळील भागामध्ये दोन मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी केल्याचे वृत्त सूत्रांनी दिले. 

प्योंगयांग - उत्तर कोरियाने आज (बुधवार) या देशाच्या पूर्व सागरी तटाजवळील भागामध्ये दोन मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी केल्याचे वृत्त सूत्रांनी दिले. 

यांपैकी पहिली चाचणी अपयशी ठरली. या चाचणींतर्गत डागण्यात आलेले क्षेपणास्त्र सुमारे 150 किमी अंतर कापल्यानंतर समुद्रामध्ये कोसळले. मात्र यानंतर काही तासांनी करण्यात आलेल्या क्षेपणास्त्राने 400 किमी अंतर पार केले. ही दोन्ही क्षेपणास्त्रे "मुसुदान क्षेपणास्त्रे‘ असल्याचा दावा दक्षिण कोरियाकडून करण्यात आला आहे. ही चाचणी यशस्वी झाल्याचे निश्‍चित झाल्यास उत्तर कोरियासाठी हे मोठे यश असल्याचे मानले जात आहे. गेल्या काही महिन्यांत उत्तर कोरियाकडून चार वेळा क्षेपणास्त्र चाचणीचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे. 

दरम्यान, दक्षिण कोरिया व अमेरिकेकडून उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र चाचणीचा "सखोल अभ्यास‘ करण्यात येत असल्याचे दक्षिण कोरियाच्या लष्करप्रमुखांनी म्हटले आहे. ही चाचणी यशस्वी झाली आहे; अथावा नाही, याबाबत मत व्यक्त करण्यास त्यांच्याकडून नकार देण्यात आला. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंदर्भात उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावाद्वारे बंदी घालण्यात आली आहे. उत्तर कोरिया आण्विक क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मानले जात आहे.