कोणत्याही क्षणी अणुचाचणी घेण्यास सज्ज : उत्तर कोरिया 

वृत्तसंस्था
सोमवार, 1 मे 2017

उत्तर कोरियाच्या सर्वोच्च नेत्यांच्या आदेशानुसार, देशाची आण्विक क्षमता वाढविण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही क्षणी अणुचाचणी घेतली जाईल

सेऊल : 'कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही क्षणी अणुचाचणी घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत', असा इशारा उत्तर कोरियाने आज (सोमवार) पुन्हा दिला. यामुळे या भागातील तणावात आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत. 

गेल्या काही आठवड्यांपासून उत्तर कोरिया आणि अमेरिकेत शाब्दिक संघर्ष सुरू आहे. उत्तर कोरियाने लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करत या संघर्षाला आणखी फोडणी दिली. 'आता अमेरिकेने आमच्याविरोधात कोणतीही कारवाई केली, तर प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत', असे विधान उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने केले. 

'उत्तर कोरियाच्या सर्वोच्च नेत्यांच्या आदेशानुसार, देशाची आण्विक क्षमता वाढविण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही क्षणी अणुचाचणी घेतली जाईल', असेही या प्रवक्‍त्याने म्हटले आहे.

गेल्या 11 वर्षांत उत्तर कोरियाने पाच वेळा अणुचाचणी केली आहे. अमेरिकेपर्यंत मारक क्षमता असलेले व अण्वस्त्र वाहून नेणारे क्षेपणास्त्र तयार करण्याचे उत्तर कोरियाचे जुने स्वप्न आहे. त्या दिशेने हा देश प्रगती करत असल्याचेही गुप्तचर यंत्रणांचे अहवाल आहेत. 'उत्तर कोरियाकडे अण्वस्त्रे नसती, तर इतर देशांप्रमाणेच अमेरिकेने आमच्यावरही लष्करी कारवाई केली असती', असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या लष्करांचा संयुक्त सराव नुकताच संपला आहे. मात्र, दोन्ही देशांच्या नौदलांचा संयुक्त सराव सुरू आहे.