पाकची भारताविरोधात पुन्हा एकदा कागाळी

पीटीआय
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

इस्लामाबाद - पाकिस्तानने आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीमधील कायमस्वरूपी सदस्य देशांच्या राजदूतांना एकत्र बोलावत जम्मू-काश्‍मीरमधील परिस्थिती सांगत भारताविरोधात कागाळी केली. तसेच, जम्मू-काश्‍मीरमध्ये सार्वमत घेण्याचे या देशांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण करावे, असेही आवाहन पाकिस्तानने केले आहे.

जम्मू-काश्‍मीरमध्ये भारतीय लष्कराकडून मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे विशेष सल्लागार सईद तारिक फातेमी यांनी चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका या देशांच्या राजदूतांना सांगितले. काश्‍मीरमध्ये मानवाधिकारांची स्थिती ढासळत असून, भारताकडून सातत्याने होणारा शस्त्रसंधीचा भंग आणि सीमारेषेवरील गोळीबार यामुळे नागरिक अडचणीत आल्याचा दावाही पाकिस्तानने या वेळी केला. भारताकडून पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया होत असल्याचा कांगावाही पाकिस्तानने या देशांच्या राजदूतांसमोर केला. जम्मू-काश्‍मीरमध्ये सार्वमत घेण्यात यावे, असे राष्ट्रसंघाच्या ठरावात मान्य केले असल्याने हे आश्‍वासन पूर्ण करावे, असे फातेमी यांनी आवाहन केले.