पाकच्या दृष्टीने 'तो' ऑस्करविजेता मुस्लिम नव्हे काफिर!

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

पाकिस्तानच्या राज्यघटनेत 1984 मध्ये नव्याने तरतूद करण्यात आली. त्यानुसार, अहमदी मुस्लिम स्वतःला मुस्लिम म्हणवून घेऊ शकत नाहीत. तसेच, त्यांच्या प्रार्थनास्थळांना ते मस्जिद म्हणू शकत नाहीत. 

वॉशिंग्टन- ऑस्कर पुरस्कार पटकाविणारा पहिला मुस्लिम म्हणून चर्चेत आलेला मेहेरशाला अली याचे कौतुक मात्र मुस्लिम देश म्हणवून घेणाऱ्या पाकिस्तानला नाहीच, परंतु त्याला मुस्लिम मानायलाही पाकिस्तान तयार नाही. 

संयुक्त राष्ट्रसंघातील पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधी माहीला लोधी यांनी मेहेरशाला अली याचे ट्विटरवरून जाहीर अभिनंदन केले. मात्र, पाकमधून होणाऱ्या टीकेनंतर त्यांनी ते ट्विट डिलीट करून टाकले. कारण, पाकिस्तानच्या दृष्टीने तो मुस्लिमच नाही. अली हा अहमदी तथा अहमदिया पंथातील मुस्लिम आहे. पाकिस्तानने त्यांच्या राज्यघटनेत  अहमदियांचा मुस्लिमेतर (नॉन-मुस्लिम) लोकांमध्ये करण्यात आला असून, त्यांना मुस्लिम समाजाकडून वाळीत टाकण्यात आले आहे. 

मेहेरशाला अली याला मूनलाईट या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारासाठी 'लायन'मधील भूमिकेसाठी देव पटेल, 'हेल ऑर हाय वॉटर'मधील भूमिकेसाठी जेफ ब्रिजेस, 'नॉक्टर्नल अॅनिमल्स'मधील भूमिकेसाठी मायकेल शॅनन, आणि 'मँचेस्टर बाय द सी'मधील भूमिकेसाठी लुकास हेजेस यांचे नामांकन करण्यात आले होते. 

अली याने 1999 मध्ये त्याची पत्नी अमतुस करीम हिच्या विनंतीवरून मुस्लिम धर्म स्वीकारला. प्रेषित मानल्या जाणाऱ्या मिर्झा गुलाम अहमद यांची शिकवण अहमदिया पंथात दिली जाते. कट्टरपंथीय मुस्लिमांकडून अहमदियांचा उल्लेख काफिर म्हणून केला जातो, तसेच त्यांचा सातत्याने छळ केला जातो.
 

Web Title: Pakistan envoy deletes tweet congratulating Mahershala Ali for Oscar win