मुस्लिमांचे हत्याकांड घडविणारे मोदीच खरे दहशतवादी: पाक परराष्ट्र मंत्री

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

स्वराज यांनी राष्ट्रसंघात बोलताना पाकिस्तान हा दहशतवादाची निर्यात करणारा देश असल्याची टीका केली. मात्र त्यांच्या देशाचे पंतप्रधानच दहशतवादी आहेत. त्यांच्या हाताला गुजरातमध्ये हत्या करण्यात आलेल्या मुसलमानांचे रक्त लागले आहे

नवी दिल्ली - जागतिक दहशतवादाचे केंद्रस्थान असलेल्या पाकिस्तानला भारताकडून नुकतेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर "योग्य स्थान' दाखविण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे "दहशतवादी' असल्याची टीका केली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तान हा दहशतवादाची निर्यात करणारा प्रमुख देश असल्याची टीका राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरुन बोलताना केली होती. ही टीका पाकिस्तानला चांगलीच झोंबली आहे!

"स्वराज यांनी राष्ट्रसंघात बोलताना पाकिस्तान हा दहशतवादाची निर्यात करणारा देश असल्याची टीका केली. मात्र त्यांच्या देशाचे पंतप्रधानच दहशतवादी आहेत. त्यांच्या हाताला गुजरातमध्ये हत्या करण्यात आलेल्या मुसलमानांचे रक्त लागले आहे. भारतावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना या दहशतवादी संघटनेचेच राज्य आहे,'' अशी टीका आसिफ यांनी केली.

दहशतवादाचा आश्रय देण्याचे धोरण राबवित असल्यामुळे पाकिस्तानवर सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा दबाव आणला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर पाककडून आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

Web Title: Pakistan Foreign Minister Khawaja Asif calls Narendra Modi an ‘elected terrorist’