भारत, पाक कायम शत्रू राहू शकत नाहीत : नसीर 

वृत्तसंस्था
बुधवार, 12 एप्रिल 2017

केवळ बळाचा वापर न करता मने जिंकून धोरणांमध्ये बदल करताना कट्टर विचारधारा कमी केली जाऊ शकते.

इस्लामाबाद - काश्‍मीरच्या मुद्यावरून अन्यत्र चर्चा वळवून भारत द्विपक्षीय संबंधाला बाधा आणत असल्याचा आरोप करत पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नसीर जानजुआ यांनी दोन्ही शेजारी देशांमध्ये कायम शत्रूत्व राहू शकत नाही आणि त्यांनी त्यांचे वादग्रस्त मुद्दे सोडविण्यासाठी संपर्कात राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. 

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे भारत-पाकिस्तान दरम्यानचे संबंध तणावपूर्ण बनल्याच्या पार्श्‍वभूमीवर जानजुआ यांनी भारताशी संबंधित आपल्या हितसंबंधांमुळे आंतरराष्ट्रीय समुदाय काश्‍मीरच्या मुद्याकडे पाहात असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, जर भारत काश्‍मीर हा द्विपक्षीय मुद्दा असल्याचा विचार करत असला तरी, त्यांनी या मुद्‌द्‌यावर कोणत्याही प्रकारची चर्चा टाळत द्विपक्षीय हेतूचा पराभव केला आहे. 

केवळ बळाचा वापर न करता मने जिंकून धोरणांमध्ये बदल करताना कट्टर विचारधारा कमी केली जाऊ शकते, असेही जानजुआ यांनी काश्‍मीरमधील स्थितीचा संदर्भ देत सांगितले.