पाकच्या उच्चस्तरीय बैठकीत भारताचा निषेध

पीटीआय
गुरुवार, 1 जून 2017

दरम्यान, कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या मुद्यावरही बैठकीत चर्चा झाल्याचा दावा स्थानिक माध्यमांनी केला आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी घेतलेल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत काश्‍मीरमध्ये भारताकडून होत असलेल्या पाकिस्तानी लष्कर आणि नागरिकांवरील अत्याचारासंदर्भात भारताचा निषेध करण्यात आला.

पंतप्रधान कार्यालयात झालेल्या या बैठकीत काश्‍मिरी नागरिकांना नैतिक आणि राजनैतिक पाठिंबा देण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर देशांतर्गत आणि देशाबाहेरील सुरक्षेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या वेळी या समितीने भारतीय संरक्षण दलांकडून जम्मू-काश्‍मीरमधील निष्पाप नागरिकांवर अत्याचार होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. त्याचबरोबर पाकिस्तानच्या पूर्व आणि पश्‍चिम सीमेच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली.

चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या सुरक्षेचा मुद्दाही चर्चेत आला. दहशतवादविरोधी पाकिस्तानकडून सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल समितीने समाधान व्यक्त केले. दरम्यान, कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या मुद्यावरही बैठकीत चर्चा झाल्याचा दावा स्थानिक माध्यमांनी केला आहे.
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ, अर्थमंत्री इसाक दर, गृहमंत्री निसार अली खान, परराष्ट्र व्यवहार सल्लागार क्वामर जावेद बाज्वा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार निवृत्त लेफ्टनंट जनरल नासेर खान जांजुआ आदी उच्चाधिकारी बैठकीस उपस्थित होते.