परवेझ मुशर्रफ यांची पाकमध्ये महाआघाडी

वृत्तसंस्था
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी 23 राजकीय पक्षांची मोट बांधत महाआघाडी तयार केल्याची माहिती पाकिस्तानमधील माध्यमांनी दिली आहे. पाकिस्तान अवामी इत्तेहाद (पीएआय) असे या महाआघाडीचे नामकरण झाले असून, मुशर्रफ हे अध्यक्ष, तर इशक दार हे सरचिटणीस असतील.

लष्करप्रमुख मुशर्रफ यांनी दुबई येथून पाकिस्तानमधील माध्यमांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. मुहाजिरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व पक्षांनी महाआघाडीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. तसेच कराची येथील मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (एमक्‍यूएम) आणि पाक सरजमीन पार्टी (पीएसपी) या दोन पक्षांनाही त्यांनी निमंत्रण दिले. पुढील निवडणुकांमध्ये सर्व सदस्य पक्ष एकाच नावावर निवडणूक लढतील, असे मुशर्रफ यांनी सांगितले. "एमक्‍यूएम'चे नेतृत्व करण्याच्या वृत्ताचा मात्र त्यांनी साफ इन्कार करत "अल्पसंख्य, वांशिक पक्षा'चे प्रमुखपद स्वीकारण्याचा विचार करणे मूर्खपणाचे आहे, असे म्हटले. "एमक्‍यूएम'ने पूर्वीचा विश्‍वास गमावला असल्याने त्यांनी आता आमच्या महाआघाडीत सहभागी व्हावे, असे आवाहन मुशर्रफ यांनी केले.

मुशर्रफ यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये देशद्रोहाचा खटला सुरू आहे. त्यांच्यावरील प्रवासबंदी हटविल्यानंतर ते गेल्या वर्षी मार्चमध्ये दुबईला गेले होते. योग्य वेळ येताच आपण पाकिस्तानमध्ये परतू, असे आश्‍वासन त्यांनी या वेळी दिले. पाकिस्तान तेहरिके इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रानखान यांनी केवळ आपल्या पक्षाचा विचार न करता पाकिस्तानचा विकास करण्याचा विचार करावा, असा टोलाही त्यांनी मारला.

Web Title: pakistan news pervez musharraf and politics