द्विपक्षीय संबंधांमध्ये भारताकडूनच आडकाठी

वृत्तसंस्था
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

काश्‍मीर प्रश्नी आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. या विभागात शांतता कायम राहावी म्हणून काश्‍मीर मुद्यावर संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) ठरावानुसार मार्ग काढण्याची आवश्‍यता असल्याचेही ते म्हणाले

इस्लामाबाद - भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये भारतानेच आडकाठी आणली असल्याचा कांगावा पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांनी आज केला. दोन्ही देशांत चांगले संबंध निर्माण करण्यामध्ये भारताच्या विस्तारवादी भूमिकेमुळे अडथळा निर्माण होत असल्याचे वक्तव्य अब्बासी यांनी आज केले. पाकिस्तानच्या 70व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला उद्देशून केलेल्या भाषणात अब्बासी यांनी वरील मत व्यक्त केले. सार्वभौम समानतेवर आधारलेले सकारात्मक आणि विधायक स्वरूपाचे संबंध सर्व देशांबरोबर निर्माण करण्याची पाकिस्तानची इच्छा असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

परस्परांच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करत शेजारी देशांबरोबर सकारात्मक संबंध प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मतभेदांच्या सर्व मुद्यांवर शांती आणि संवादातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आमच्या सरकारने केला. मात्र, भारताच्या विस्तारवादी भूमिकेमुळे त्यात अडचणी निर्माण झाल्या. भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या संबंधांमध्ये सुधारणा न होण्यास ही बाब कारणीभूत ठरली आहे, असे मत अब्बासी यांनी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी
पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर अब्बासी यांनी देशाला उद्देशून केलेल्या पहिल्याच भाषणात काश्‍मीरचा मुद्दा उपस्थित केला. काश्‍मीर प्रश्नी आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. या विभागात शांतता कायम राहावी म्हणून काश्‍मीर मुद्यावर संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) ठरावानुसार मार्ग काढण्याची आवश्‍यता असल्याचेही ते म्हणाले.