पाक शांतताप्रिय देश: शरीफ यांचा कांगावा

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 एप्रिल 2017

पाकिस्तानने शेजारी देशांबरोबर उत्तम संबंध राखले आहेत. आम्हाला संघर्ष नको असून सहकार्याची अपेक्षा आहे. पाकिस्तान मैत्रीचा हात पुढे करण्यास मागेपुढे पाहणार नाही

इस्लामाबाद - कुलभूषण जाधव या भारतीय नागरिकास हेरगिरीच्या संशयावरुन फाशी देण्याच्या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानला शेजारी देशांबरोबर चांगले संबंध रहावेत, अशी इच्छा असल्याचे म्हटले आहे. जाधव यांना फाशी देण्याच्या निर्णयानंतर भारताबरोबरील राजनैतिक तणाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना शरीफ यांनी पाकिस्तान हा शांतताप्रिय देशच असल्याचा दावा केला.

"पाकिस्तान हा शांतताप्रिय देश आहे. पाकिस्तानने शेजारी देशांबरोबर उत्तम संबंध राखले आहेत. आम्हाला संघर्ष नको असून सहकार्याची अपेक्षा आहे. पाकिस्तान मैत्रीचा हात पुढे करण्यास मागेपुढे पाहणार नाही,'' असे शरीफ म्हणाले. मात्र त्याचवेळी पाकिस्तानला असलेल्या कोणत्याही धोक्‍याचा समाचार घेण्यासाठी पाकचे सैन्य पूर्णत: सक्षम असल्याचा दावाही पाक पंतप्रधानांकडून करण्यात आला.

हेरगिरीच्या आरोपावरून फाशीची शिक्षा देण्यात आलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची पाकिस्तानकडून पूर्वनियोजित हत्या होत असल्याची भूमिका भारताने व्यक्त केली आहे. या प्रकरणी पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसित यांना समन्स बजाविण्यात आले आहे.

भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कायदा आणि न्यायाच्या मुलभूत नियमांना डावलून पाकिस्तानने एका भारतीय नागरिकाला फाशीची शिक्षा सुनाविली आहे. 

Web Title: Pakistan PM Nawaz Sharif says he wants peace with India