गिलगिट-बाल्टिस्तान पाकिस्तानचा प्रांत होणार

वृत्तसंस्था
बुधवार, 15 मार्च 2017

गिलगिट बाल्टिस्तानला प्रांत म्हणून घटनात्मक दर्जा देण्याच्या निर्णयामुळे काश्‍मीर भागातील राजकारणावर दुरगामी व संवेदनशील परिणाम होण्याची दाट शक्‍यता आहे

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या नियंत्रणातील "गिलगिट - बाल्टिस्तान' या व्यूहात्मक दृष्टया अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या भागास पाकिस्तानकडून लवकरच देशातील पाचवा प्रांत म्हणून मान्यता देण्यात येईल, असे सूत्रांनी म्हटले आहे. गिलगिट बाल्टिस्तान हा भाग पाकव्याप्त काश्‍मीरला लागून आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र संबंध सल्लागार सरताज अझीझ यांनी यासंदर्भातील प्रस्ताव मांडल्याची माहिती येथील आंतरप्रांतीय समन्वय मंत्री रियाझ हुसेन यांनी म्हटले आहे. गिलगिट बाल्टिस्तान भागास पाकिस्तानकडून वेगळ्या भूभागाचा दर्जा देण्यात आला आहे. येथे स्वतंत्र विधानसभा असून मुख्यमंत्रीही निवडला जातो. आता या भागास पाकिस्तानचा प्रांत म्हणून मान्यता देण्यासाठी घटनादुरुस्ती केली जाणार असल्याचे हुसेन यांनी सांगितले.

पंजाब, सिंध, खैबर पख्तुन्ख्वां आणि बलुचिस्तान हे पाकिस्तानचे चार प्रांत आहेत. मात्र गिलगिट बाल्टिस्तानला प्रांत म्हणून घटनात्मक दर्जा देण्याच्या निर्णयामुळे काश्‍मीर भागातील राजकारणावर दुरगामी व संवेदनशील परिणाम होण्याची दाट शक्‍यता आहे.