"यूएन'च्या वाहनांवर भारताकडून हल्ला नाही

पीटीआय
शुक्रवार, 26 मे 2017

संयुक्त राष्ट्रसंघाने फेटाळला पाकचा दावा
 

न्यूयॉर्क : नियंत्रण रेषेजवळ भारतीय जवानांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) लष्करी निरीक्षकांच्या वाहनांवर हल्ला केल्याचा पाकिस्तानी सैन्याचा दावा राष्ट्रसंघाने गुरुवारी फेटाळला. निरीक्षकांना लक्ष्य केल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे राष्ट्रसंघाने म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस एंतोनियो गुतारेस यांचे प्रवक्ते स्टीफन डुजारिक यांनी सांगितले, की खंजर सेक्‍टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराने यूएनएमओजीआयपीच्या (भारत तसेच पाकिस्तानमधील संयुक्त राष्ट्रसंघाचे लष्करी निरीक्षक गट) वाहनाला लक्ष्य केल्याचा कोणताही पुरावा नाही. भीमबेर जिल्ह्यात पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याबरोबर जात असलेल्या यूएनएमओजीआयपीच्या लष्करी निरीक्षकांनी जवळच्या भागात गोळीबाराचा आवाज ऐकला. या गोळीबारात लष्करी निरीक्षकांना लक्ष्य करण्यात आल्याचा कोणताही पुरावा नाही.

संयुक्त राष्ट्रसंघाचा एकही लष्करी निरीक्षक जखमी झालेला नाही. पाकिस्तानी लष्करी दलाच्या माध्यम शाखेच्या निवेदनात म्हटले होते, की नियंत्रण रेषेजवळ दौऱ्यादरम्यान संयुक्त राष्ट्रसंघाच्या लष्करी निरीक्षक गटाच्या दोन अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर भारतीय जवानांनी हल्ला केला.