मॅक्रॉन यांच्यासोबत काम करण्यास मोदी उत्सुक

टीम ई सकाळ
सोमवार, 8 मे 2017

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर पंतप्रधान मोदींनी मॅक्रॉन यांचे अभिनंदन केले. भारत-फ्रान्स संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. 

नवी दिल्ली : भारत-फ्रान्स यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत जवळून काम करू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

फ्रान्सच्या अध्यक्षपदासाठी काल 65.3 टक्के (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत) मतदान झाले. अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी 1969 नंतर हे सर्वांत कमी मतदान आहे. उजव्या विचारसरणीच्या नॅशनल फ्रंट पक्षाच्या नेत्या मरीन ल पेन आणि एन मार्श या पक्षाचे संस्थापक इमॅन्युएल मॅक्रॉन हे रिंगणात होते. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मतदानाच्या पहिल्या फेरीत इतर सर्व उमेदवारांमध्ये या दोघांनीच आघाडी घेतली होती. त्यामुळे स्पष्ट बहुमतासाठी आज 'रन ऑफ' फेरी झाली. मतदानानंतर कोणता उमेदवार निवडून येईल, याबाबत फ्रान्समध्ये प्रचंड उत्सुकता होती. 

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर पंतप्रधान मोदींनी मॅक्रॉन यांचे अभिनंदन केले. भारत-फ्रान्स संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. 

पहिल्या टप्प्यात कोणत्याही उमेदवारास स्पष्ट बहुमत न मिळाल्याने 'एन मार्च' या पक्षाचे नेते एमॅन्युएल मॅक्रॉन आणि 'नॅशनल फ्रंट' या पक्षाच्या नेत्या मरिन ले पेन या दोन मुख्य उमेदवारांमध्ये येत्या 7 मे रोजी पुन्हा एकदा निवडणूक घेण्यात आली. फ्रान्सचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकॉईस हॉलंड (सोशालिस्ट पार्टी) यांनी अध्यक्षपदाची ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला होता.

'राष्ट्रवाद व दहशतवादा'ची छाया फ्रेंच निवडणुकीवर होती. फ्रान्समध्येही आर्थिक समस्येबरोबरच निर्वासित व दहशतवाद असे दोन बाजू असणारे हे आव्हान राजकीयदृष्टया अधिक प्रबळ ठरणारे होते. फ्रान्ससोबत एकंदर जागतिक राजकारणास निर्णायक वळण देणारी म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात होते.