बोरीस जॉन्सन पुन्हा अडचणीत...

नीतिमूल्य सल्लागाराचा अहवाल : पार्ट्या केल्याबद्दल खुलासा हवा
Prime Minister of UK Boris Johnson Parties during lockdown  trouble again london
Prime Minister of UK Boris Johnson Parties during lockdown trouble again londonsakal

लंडन : लॉकडाउनच्या कालावधीत पार्ट्या केल्यानंतरही ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांची खुर्ची बचावली. त्यांचे केवळ दंडावर निभावले. मात्र याच कारणावरून ते पुन्हा अडचणीत आले आहेत. देशातील मंत्र्यांना लागू असलेल्या आचारसंहितेचा यामुळे भंग झाला नाही असे त्यांना का वाटते याचा खुलासा मागविण्यात आला आहे. विशेष म्हणजे जॉन्सन यांचे नीतिमूल्य सल्लागार लॉर्ड ख्रिस्तोफर गेईट यांनी हे पाऊल उचलले आहे. गेईट हे जॉन्सन यांचे स्वतंत्र सल्लागार आहेत. ते थेट जॉन्सन यांनाच बांधील आहेत. त्यांनी मंत्र्यांविषयीच्या मुद्द्यांचा वार्षिक अहवाल सादर केला. त्यानुसार जॉन्सन यांच्यावर आपली बाजू जाहीरपणे मांडण्याचे आणखी दडपण आले आहे.

डाऊनिंग स्ट्रीट येथे जून २०२० मध्ये लॉकडाऊन काळात वाढदिवसानिमित्त जॉन्सन यांनी पार्टी आयोजित केली. याबद्दल महानगर पोलिसांनी त्यांना निर्धारित दंड भरण्यासाठी नोटीस बजावली आहे. यामुळे एक वैध प्रश्न निर्माण झाल्याचे अहवालात नमूद करून गेईट यांनी म्हटले आहे की, जॉन्सन यांना जनतेसमोर आपली बाजू मांडावीच लागेल.

जॉन्सन यांनी गेईट यांना पत्र पाठवून आपली बाजू मांडली. हे पत्र आता सार्वजनिक करण्यात आले आहे. त्यात जॉन्सन म्हणतात की, ज्या परिस्थितीत दंडाची नोटीस मिळाली ती निर्बंधांच्या विरोधात आहे असे वाटत नाही. मी याचा निकाल स्वीकारला आहे. कायदेशीर बाबींची पूर्तता करून मी दंडाची रक्कमही भरली आहे. निर्धारित दंड भरणे म्हणजे गुन्हेगारी स्वरूपाचे दोषित्व नव्हे.

जॉन्सन यांना वारंवार सल्ला द्यावा लागल्याचेही गेईट यांनी नमूद केले आहे. ते म्हणले की, तुम्हीच स्वतः केलेल्या मंत्र्यांच्या आचारसंहितेनुसार जाहीर खुलासा देणे तुम्हाला बंधनकारक आहे. आचारसंहितेचा भंग झाल्यास साधारणपणे मंत्र्याला राजीनामा द्यावा लागतो. अशावेळी तुम्ही जाहीर भूमिका मांडलीच पाहिजे, असे जॉन्सन यांना वारंवार सांगावे लागले, मात्र त्यांनी लक्ष दिले आहे. त्यांना जाहीर पातळीवर एकदा सुद्धा खुलाशाबाबत उल्लेख केला नाही.

जॉन्सन यांनी आपल्या कृत्याचे जोरदार समर्थन केले आहे. संबंधित कार्यालयांमधील समन्वयाच्या अभावी खुलासा देण्यात विलंब झाल्याची सबब त्यांनी पुढे केली आहे. असे असले तरी त्यांच्या नेतृत्वाविषयी हळूहळू पण असंतोष निर्माण होत आहे. त्यात यामुळे भर पडली. याप्रकरणी जॉन्सन यांना स्वपक्षातून विरोधाला सामोरे जावे लागत आहे. त्यांनी पक्षाचा नेता म्हणूनच नव्हे तर पंतप्रधानपदाचाही राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी होत आहे. अनेक सदस्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

विरोधकांचे बिअरगेट

जॉन्सन यांचा सत्ताधारी पुराणमतवादी (कॉन्झर्व्हेटीव्ह) पक्ष पार्टीगेटमुळे अडचणीत आला असताना विरोधकांचीही कोंडी झाली आहे. लेबर पक्षाचे नेते केईर स्टार्मर यांच्यावरून वाद झाला आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात निवडणुकीशी संबंधित बैठकीच्यावेळी त्यांच्या हातात बीअरची बाटली होती असे छायाचित्र व्हायरल झाले. याप्रकरणी कोविड निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना तसेच अन्य एक नेत्या अँजेला रेनर यांना प्रश्नावली पाठवली आहे. या प्रकरणास बिअरगेट असे संबोधले जात आहे. या दोन्ही नेत्यांनी कोणत्याही नियमांचा भंग केला नसल्याचा दावा केला आहे. दंड ठोठावला गेल्यास राजीनामा देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com