कतार नेणार नैसर्गिक वायुचे उत्पादन वर्षाला 10 कोटी टनांपर्यंत...

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 जुलै 2017

जगातील सर्वांत मोठा नैसर्गिक वायु (एलएनजी) उत्पादक देश असलेल्या कतारचे सध्याचे उत्पादन वर्षाला 7.7 कोटी टन इतके आहे. या नव्या प्रकल्पामुळे कतारचे आंतरराष्ट्रीय राजकारणातील स्थान अधिक मजबूत होईल

दोहा - पश्‍चिम आशियातील देशांनी राजनैतिक बहिष्कार घातलेल्या कतारकडून आज (मंगळवार) येत्या काही वर्षांत नैसर्गिक वायुचे उत्पादन तब्बल 30 टक्‍क्‍यांनी वाढविण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.

2024 पर्यंत नैसर्गिक वायुचे उत्पादन वर्षाला 10 कोटी टनांपर्यंत नेण्याचे लक्ष्य समोर ठेवण्यात आल्याची माहिती "कतार पेट्रोलियम'चे प्रमुख साद शरीदा अल काबी यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना दिली. जगातील सर्वांत मोठा नैसर्गिक वायु (एलएनजी) उत्पादक देश असलेल्या कतारचे सध्याचे उत्पादन वर्षाला 7.7 कोटी टन इतके आहे. या नव्या प्रकल्पामुळे कतारचे आंतरराष्ट्रीय राजकारणातील स्थान अधिक मजबूत होईल, असे काबी म्हणाले.

गेल्या महिन्यात सौदी अरेबिया व पश्‍चिम आशियातील इतर महत्त्वपूर्ण देशांनी कतारवर लादलेल्या निर्बंधांच्या बहिष्काराच्या पार्श्‍वभूमीवर कतारकडून करण्यात आलेली ही घोषणा अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे. या निर्बंधांना न जुमानताही नैसर्गिक वायु उत्पादन 10 कोटी टनांपर्यंत नेण्याचा निर्धार कतारने केला आहे. दरम्यान, सौदी अरेबिया व पश्‍चिम आशियातील इतर सौदीमित्र देश कतारसंदर्भातील अंतिम निर्णय उद्या (बुधवार) घेण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.