आणखी वेगाने विकास करू

donald-trump
donald-trump

वॉशिंग्टन - मी प्रत्येक अमेरिकी नागरिकाचा अध्यक्ष असून आपण सर्वांनी एकत्र येऊन देश नव्याने घडवूया, असे आवाहन करत नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थकांना संबोधित केले. माझ्याकडे देशाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी आराखडा तयार असून आता आणखी वेगाने देशाचा विकास करू, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. 


हिलरी क्‍लिंटन यांचा मी आभारी आहे, त्यांनी निवडणुकीत खूप मेहनत घेतली असून देशासाठी त्यांनी केलेल्या कामाचे मी कौतुक करतो, असेही त्यांनी नमूद केले. 

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अनपेक्षित विजय मिळवला. डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्‍लिंटन यांचा पराभव केल्यानंतर ट्रम्प यांनी समर्थकांशी संवाद साधला. आपण मोहीम नव्हे, तर एक चळवळ राबवली होती. आपल्या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले असे सांगत त्यांनी समर्थकांचे आभार मानले. ही ऐतिहासिक घटना आहे, पण आपल्याला आता चांगले कार्य करून इतिहास रचवून दाखवायचा आहे, असे त्यांनी सांगितले. आमच्यासोबत येण्यासाठी इच्छुक असलेल्या देशांना सोबत घेऊन पुढे जाऊ असे त्यांनी स्पष्ट केले. माझ्याकडे चांगली योजना आहे, आपली अर्थव्यवस्था दुप्पट करायची आहे, असे सांगत ट्रम्प पुढे म्हणाले, ‘‘अमेरिकेला आर्थिक महासत्ता बनवायचे आहे. यासाठी आपण एकत्र काम करणे गरजेचे असून आपल्यात खूप क्षमता आहे आणि आपण स्वप्न पूर्ण करू शकतो, असे त्यांनी सांगितले.

ट्रम्प यांचे चाणक्‍य

डोनाल्ड ट्रम्प यांची प्रचारमोहीम यशस्वीरित्या राबविणारे रेईन्स पेरीबस हे त्यांचे राजकीय चाणक्‍य ठरले आहेत. अखेरच्या टप्प्यात वाचाळपणामुळे प्रचारात पिछाडीवर गेलेल्या ट्रम्प यांना अग्रस्थानी आणण्याचे कठीण काम त्यांनी केले होते. रिपब्लिकन नॅशनल कमिटीचे अध्यक्ष असणाऱ्या पेरीबस यांच्याकडे लष्कराचे प्रमुखपद सोपविले जाऊ शकते. 

भविष्यवाणी खरी ठरली
भारतात एका माशाने तर चीनमध्ये माकडाने या निवडणुकीमध्ये ट्रम्प विजयी होतील, अशी भविष्यवाणी वर्तविली होती. ती अखेर खरी ठरली आहे. चेन्नईमधील चाणक्‍य नावाच्या माशाने हा अंदाज वर्तविला होता. या माशाने ट्रम्प यांच्या फोटोसमोरील खाद्य खाऊन त्यांच्या बाजूने कौल दिला होता. चीनमधील माकड ‘किंग ऑफ प्रॉफीट’नेदेखील ट्रम्प यांच्या विजयाची भविष्यवाणी केली होती. ती देखील तंतोतंत खरी ठरली आहे. यापूर्वीही या माकडाने अशी असंख्ये भाकिते वर्तविली आहेत.

बिल्डर ते अमेरिकेचे अध्यक्ष -

आक्रमक प्रचार
ट्रम्प हे स्वत: स्थलांतरितांच्या विषयावर आक्रमक मते मांडत होते. यामुळे आपसूक अमेरिकी जनतेमधील राष्ट्रवादी भावनेला बळ मिळाले. यात त्यांनी विखारी भाषणे करून आणखी तेल ओतले. त्यांनी आर्थिक अस्थैर्य, मुस्लिम, निर्वासित आणि दहशतवादासारख्या मुद्यांचे प्रचारामध्ये भांडवल केले. महिलांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ट्रम्प वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. याचा फटका त्यांच्या प्रचारासही बसला होता. ट्रम्प हे १९८७ पासून अध्यक्षपदासाठी इच्छूक होते; पण बराक ओबामा यांनी २०११ मध्ये व्हाइट हाउसच्या करस्पाँडंट डिनरमध्ये त्यांच्यावर विनोद केल्याने ते चांगलेच दुखावले आणि त्यांनी कोणत्याही स्थितीमध्ये अध्यक्ष व्हायचंच असा निश्‍चय केला. अमेरिकी नागरिकत्वाच्या मुद्यावरून ट्रम्प यांनी ओबामांनाही लक्ष्य केले होते. अमेरिकेच्या सील कमांडो पथकाने मे २०११ मध्ये अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या ओसामा बिन लादेन याला ठार मारल्यानंतर राजकारणाची सगळी गणितेच बदलली आणि ओबामा पुन्हा हीरो झाले. यामुळे ट्रम्प यांचा प्रचार मागे पडला. त्यानंतर चार वर्षांनंतर पुन्हा ट्रम्प रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या मोहिमेत उतरले. 

उद्योगी पार्श्‍वभूमी
न्यूयॉर्कमधील रिअल इस्टेटमधील आघाडीचे उद्योजक फ्रेंड ट्रम्प यांचे चौथे अपत्य म्हणजे डोनाल्ड ट्रम्प होय. व्हार्टन स्कूलमध्ये धडे गिरवल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांचा उद्योग सांभाळला होता. ट्रम्प ज्या वेळी कंपनीत आले तेव्हा त्यांच्या कंपनीवर दहा लाख अमेरिकी डॉलरचे कर्ज होते. ट्रम्प यांनी या संकटातूनदेखील मार्ग काढत न्यूयॉर्कमधील गृहनिर्माण प्रकल्प यशस्वी करून दाखविले. पुढे १९७१ मध्ये त्यांच्या कंपनीचे ट्रम्प ऑर्गनायझेशन असे नामकरण करण्यात आले. ट्रम्प यांचे सिग्नेचर टॉवर सर्वाधिक महागडी इमारत म्हणून ओळखली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com