पाकिस्तानचे माजी सुरक्षा मंत्री झाले "एप्रिल फूल'!

वृत्तसंस्था
रविवार, 2 एप्रिल 2017

मलिक यांनी या वृत्ताचा हवाला देत पाकिस्तानमध्ये सत्तेत असलेल्या नवाझ शरीफ सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आणि स्वत:चे हसे करुन घेतले

इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी अंतर्गत सुरक्षा मंत्री रेहमान मलिक यांना पाकिस्तानमधील महत्त्वपूर्ण वृत्तपत्र असलेल्या "दी एक्‍सप्रेस ट्रिब्यून' या वर्तमानपत्राने चक्क "एप्रिल फूल' बनविले आहे!

या वृत्तपत्राने 1 एप्रिल चे निमित्त साधून संकेतस्थळावर दिलेली एक "फेक न्यूज' खरी वाटून मलिक यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. मलिक यांनी या वृत्ताचा हवाला देत पाकिस्तानमध्ये सत्तेत असलेल्या नवाझ शरीफ सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आणि स्वत:चे हसे करुन घेतले.

पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबाद शहरामधील नवीन विमानतळास देशातील महत्त्वपूर्ण नेत्या बेनझीर भुट्टो यांचे नाव देण्यात आले आहे. भुट्टो या पाकमधील "पाकिस्तान पीपल्स पार्टी' या पक्षाच्या मुख्य नेत्या होत्या. मात्र आता या विमानतळास भुट्टो यांच्याऐवजी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे नाव देण्यात येणार असल्याचे वृत्त दी एक्‍सप्रेस ट्रिब्यूनने संकेतस्थळावर दिले होते. या "बातमी'नंतर काही तासांतच रेहमान यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. या विमानतळाचे नाव बदलण्याचा प्रयत्न केल्यास पीपीपी तीव्र संघर्ष करेल, असा इशारा मलिक यांनी दिला. रेहमान हे भुट्टो यांचे निकटवर्तीय होते.

"जनतेच्या भावना दुखाविल्या जातील, असे कोणतेही पाऊल उचलणे या सरकारने टाळावयास हवे. याआधी, पाकिस्तानच्या राष्ट्रीय नायकांची नावे देण्यात आलेल्या कोणत्याही प्रकल्पाचे नाव बदलण्यात आलेले नाही,'' असे मलिक म्हणाले.

याचबरोबर, या निर्णयासंदर्भात मलिक यांनी सरकारकडून स्पष्टीकरणही मागविले आहे!