पनामा पेपर्स: नवाज शरीफ यांचा पाय आणखी खोलात

पीटीआय
रविवार, 16 जुलै 2017

शरीफ आणि त्यांच्या मुलांची जीवनशैली उत्पन्नाशी मिळतीजुळती नसल्याचे सांगत या समितीने शरीफ यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे नवे गुन्हे दाखल करण्याची शिफारस केली आहे. तसेच, 15 जुन्या प्रकरणांचीही फेरतपासणी करण्याची शिफारसही करण्यात आली आहे

इस्लामाबाद - पनामा पेपर्स प्रकरणी स्थापन केलेल्या संयुक्त तपास पथकाने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याविरोधातील 15 प्रकरणांचा पुन्हा तपास करण्याची शिफारस केली आहे. यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शरीफ यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

पनामा पेपर्सने बेहिशेबी संपत्ती असलेल्या जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांचीही नावे आहेत. शरीफ यांची लंडन आणि इतर काही देशांमध्ये बेहिशेबी संपत्ती असल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी संयुक्त तपास समिती स्थापन करण्यात आली. या समितीने दहा जुलैला आपला अंतिम अहवाल सादर केला.

शरीफ आणि त्यांच्या मुलांची जीवनशैली उत्पन्नाशी मिळतीजुळती नसल्याचे सांगत या समितीने शरीफ यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे नवे गुन्हे दाखल करण्याची शिफारस केली आहे. तसेच, 15 जुन्या प्रकरणांचीही फेरतपासणी करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. यातील तीन प्रकरणे शरीफ यांचा पक्ष 1194 ते 2011 या काळात सत्तेवर असतानाच्या काळातील असून; इतर बारा प्रकरणे परवेझ मुशर्रफ यांच्या काळातील आहेत.

शरीफ यांच्या लंडनमधील चार इमारतींबाबतही तपास करण्याची सूचना अहवालात करण्यात आली आहे.