ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

या अधिवेशनाच्या माध्यमातून ट्रम्प यांची नवी आणि वेगळी प्रतिमा समोर येईल, असा विश्वास ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेचे प्रमुख पॉल मॅनफोर्ट यांनी व्यक्त केला आहे.

क्‍लेव्हलॅंड - अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

क्लेव्हलँड येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात ट्रम्प यांचे नाव जाहीर करण्यात आले. यावेळी ट्रम्प यांनी माझ्यासाठी हे खूप सन्मानजनक असल्याचे म्हटले आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून ट्रम्प यांची नवी आणि वेगळी प्रतिमा समोर येईल, असा विश्वास ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेचे प्रमुख पॉल मॅनफोर्ट यांनी व्यक्त केला आहे. 16 उमेदवारांमध्ये झालेल्या मतदानात डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वाधिक 1237 मताधिक्य मिळवून उमेदवारीच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. अमेरिकेतील मागील काही दिवसांतील गोळीबाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुप्तचर संस्थेचे अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. या अधिवेशनाचा कालावधी 18 ते 21 जुलै असा आहे.

अमेरिकेला पुन्हा सुरक्षित बनवूया अशी थीम असलेल्या या अधिवेशनात मंगळवारी ट्रम्प यांचे भाषण झाले. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी ट्रम्प यांना देण्यावर अधिवेशनात शिक्कामोर्तब होणार हे निश्चित होते. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांची लढत डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्याशी होणार आहे. ओबामा यांना 2007 मध्ये ज्याप्रमाणे लोकप्रियता मिळाली होती, तशीच लोकप्रियता ट्रम्प यांना मिळताना दिसत आहे. ट्रम्प यांच्या विजयासाठी ‘सिटीझन्स फॉर ट्रम्प‘ ही मोहिम सुरु करण्यात आली आहे.