तब्बल पावणेतीन लाख रोहिंग्यांचे बांगलादेशात स्थलांतर

वृत्तसंस्था
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

बांगलादेशच्या छावण्या निर्वासितांनी भरल्या असून अन्नपाण्याच्या शोधात असणाऱ्या निर्वासितांना राहण्यासाठीदेखील धडपड करावी लागत आहे. मोठ्या संख्येने म्यानमारमधून रोहिंग्या पळ काढत असून या घटनेमुळे मात्र म्यानमारच्या नेत्या आंग सान स्यू की यांच्यावर टीका होत आहे

संयुक्त राष्ट्र - म्यानमारच्या हिंसाचारग्रस्त राखीन प्रांतातून बांगलादेशमध्ये स्थलांतरित होणाऱ्या रोहिंग्या मुस्लिमांची संख्या दोन लाख 70 हजार झाली असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे. रोहिंग्या मुस्लिम आता नवीन ठिकाणी स्थलांतरित होत असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.

बांगलादेशमधील रोहिंग्या मुस्लिमांची स्थिती गंभीर असून त्यासाठी आवश्‍यक पावले उचलण्याची गरज असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे. रोहिंग्या मुस्लिमांनी म्यानमारमध्ये बौद्ध समुदायाकडून अत्याचार होत असल्याचे म्हटले आहे. आपल्या हक्काची पायमल्ली होत असून पोलिस मात्र बघ्यांची भूमिका घेत असल्याचे रोहिंग्या मुस्लिमांचे म्हणणे आहे. जोपर्यंत अधिकार बहाल होत नाहीत, तोपर्यंत मायदेशी परतणार नाही, असा निर्धार रोहिंग्यांनी केला आहे. यादरम्यान राखीन प्रांतातील हिंसाचारास 25 ऑगस्ट रोजी सुरवात झाली. त्यावेळी रोहिंग्या मुस्लिमांनी राखीन प्रांतातील अनेक पोलिस ठाणी पेटवून दिली होती. त्यानंतर सैनिक आणि पोलिस कारवाईमुळे रोहिंग्या मुस्लिम हे बांगलादेशमध्ये पलायन करत आहेत. यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्वासित प्रकरणाचे प्रवक्ते व्हिव्हियन टॅनच्या मते, बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून निर्वासितांची संख्या वाढत चालली आहे.

बांगलादेशच्या छावण्या निर्वासितांनी भरल्या असून अन्नपाण्याच्या शोधात असणाऱ्या निर्वासितांना राहण्यासाठीदेखील धडपड करावी लागत आहे. मोठ्या संख्येने म्यानमारमधून रोहिंग्या पळ काढत असून या घटनेमुळे मात्र म्यानमारच्या नेत्या आंग सान स्यू की यांच्यावर टीका होत आहे.