सीरियामध्ये निर्वासितांसाठी आता संरक्षित प्रदेश

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 जानेवारी 2017

पाठबळ पुरविण्याचे सौदीकडून मान्य

वॉशिंग्टन/रियाध: सीरिया आणि येमेनमधील संरक्षित प्रदेश (सेफ झोन) निर्माण करून त्यांना पाठबळ पुरविण्याचे सौदी अरेबियाने अमेरिकेबरोबर झालेल्या चर्चेत मान्य केले आहे. सौदीचे राजे सलमान आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.

पाठबळ पुरविण्याचे सौदीकडून मान्य

वॉशिंग्टन/रियाध: सीरिया आणि येमेनमधील संरक्षित प्रदेश (सेफ झोन) निर्माण करून त्यांना पाठबळ पुरविण्याचे सौदी अरेबियाने अमेरिकेबरोबर झालेल्या चर्चेत मान्य केले आहे. सौदीचे राजे सलमान आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.

सीरियातील निर्वासितांना संरक्षण देण्यासाठी त्याच देशामध्ये संरक्षित प्रदेश निर्माण करावे आणि त्याला आखाती देशांनी आर्थिक पाठबळ पुरवावे, अशी ट्रम्प यांची भूमिका आहे. त्यानुसार त्यांनी आज राजे सलमान यांच्याबरोबर चर्चा केली आणि या भूमिकेला सौदीकडून दुजोरा मिळविला. दोन्ही देशांनी इसिस या दहशतवादी संघटनेविरोधात एकत्र प्रयत्न करण्याचेही मान्य करण्यात आले. दोघांमध्ये झालेल्या बोलणीनुसार, सीरियाबरोबरच येमेनमध्येही असे संरक्षित प्रदेश निर्माण करून त्याला सौदी अरेबिया पाठबळ पुरविणार आहे. तसेच, निर्वासितांसाठी इतर अनेक उपाययोजनांनाही पाठबळ देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. सीरिया आणि इराकमधील इसिसविरोधातील मोहिमेमधील सहभागही सौदी अरेबिया वाढविणार आहे.
राजे सलमान आणि ट्रम्प यांच्यात तब्बल तासभर चर्चा झाली. दहशतवादाविरोधातील सहकार्याबरोबरच आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रातही सहकार्य वाढविण्याबाबत दोन्ही देशांमध्ये बोलणी झाली.

"ट्रम्प यांचे आमंत्रण रद्द करा'
लंडन : डोनाल्ड ट्रम्प यांना लंडन भेटीचे आणि राणी एलिझाबेथ यांच्याबरोबर भोजन करण्याचे दिलेले आमंत्रण ब्रिटन सरकारने मागे घ्यावे, यासाठी येथे ऑनलाइन याचिका दाखल झाली असून, त्यावर आतापर्यंत दहा लाखांहून अधिक जणांनी सही केली आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी गेल्या आठवड्यातील अमेरिका दौऱ्यादरम्यान हे निमंत्रण ट्रम्प यांना दिले होते. मात्र, प्रवेशबंदीच्या निर्णयानंतर ट्रम्प यांना ब्रिटनमध्ये बोलावले तरी लंडनमध्ये बोलावून राणीची भेट घेऊ देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.