सॅमसंगच्या प्रमुखांना अटक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

दक्षिण कोरियातील राजकीय भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई

सोल: दक्षिण कोरियातील इलेक्‍ट्रॉनिक्‍स क्षेत्रातील सॅमसंग समूहाचे उपाध्यक्ष ली जे-योंग यांना राजकीय भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आज (शुक्रवार) अटक करण्यात आली. यामुळे कंपनीच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. स्मार्टफोन निर्मितीमध्ये सॅमसंग जगभरात आघाडीवर आहे.

दक्षिण कोरियातील राजकीय भ्रष्टाचार प्रकरणी पार्क ग्वेन-ह्यू यांना अध्यक्षपदावरुन पदच्युत करण्यात आले आहे. याच भ्रष्टाचार प्रकरणी सॅमसंगचे उपाध्यक्ष ली जे-योंग यांना अटक होण्याची शक्‍यता मागील काही दिवसांपासून व्यक्त होत होती. सॅमसंग समूहाचे प्रमुख ली कून-ही आजारी असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत पुत्र ली जे-योंग समूहाची धुरा सांभाळत आहेत. समूहाचे भावी अध्यक्ष म्हणून त्यांचे नाव घेतले जात आहे. जिल्हा न्यायालयाने ली यांच्याविरुद्ध नव्याने पुरावे समोर आल्याने अटक वॉरंट बजावले. त्यानंतर तपास यंत्रणांना ली यांना अटक केली.

या अटकेबाबत कंपनीने म्हटले आहे, की पुढील न्यायालयीन सुनावणीत सत्य समोर येईल, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. न्यायालयात ली यांच्या अटकेबाबत युक्तिवाद सुरू असल्याने ली यांना कालच ताब्यात घेण्यात आले होते. पुढील काही महिन्यात या खटल्याची सुनावणी सुरू होईपर्यंत ते तपास यंत्रणांच्या कोठडीत असतील. ली यांची या प्रकरणी आधी काही वेळा चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणी ते मुख्य संशयित असून, मागील महिन्यात न्यायालयाने पुरेसे पुरावे नसल्याचे कारण दिल्याने त्यांची अटक टळली होती. तपास यंत्रणांनी न्यायालयात काल आणखी पुरावे सादर करीत त्यांच्या अटकेची मागणी केली होती.

समूहात उलथापालथ
ली यांच्या अटकेने सॅमंग समूहात उलथापालथ झाली आहे. कंपनीच्या समभागात सकाळी 1.5 टक्‍क्‍यांची घसरण झाली. कंपनीच्या "गॅलेक्‍सी नोट 7' स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट होण्याच्या घटनांनी कंपनी अडचणीत आली होती. त्यामुळे कंपनीला बाजारातून हा स्मार्टफोन परत मागवून त्याचे उत्पादन बंद करावे लागले होते. ली यांचे वडील आणि आजोबा यांना कायदेशीर कारवाईला भूतकाळात सामारे जावे लागले होते. मात्र, त्यांना कधी अटक झालेली नव्हती.

---------------------------------------------------------------------------
जागतिक पातळीवर आघाडीची कंपनी असलेल्या सॅमसंगच्या प्रतिमेला बसलेला हा धक्का अल्पकाळ असेल.
- ग्रेग रोह, विश्‍लेषक, एचएमसी इन्व्हेस्टमेंट सिक्‍युरिटीज
---------------------------------------------------------------------------
समूहात मोठ्या प्रमाणात फेरबदल होत असताना ली यांना अटक झाली आहे. यामुळे सॅमसंग काही काळ विदेशात दीर्घकालीन गुंतवणूक करण्यापासून दूर राहील.
- ली सूंग-वू, विश्‍लेषक, आयबीके इन्व्हेस्टमेंट सिक्‍युरिटीज
---------------------------------------------------------------------------