सौदी अरेबियात आता महिलाही गाडी चालवू शकणार

वृत्तसंस्था
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

हिलांवर दडपशाही करणाऱ्या आखाती देशांमधील एक अशी सौदीची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख आहे. ही बंधने हटविण्यासाठी महिला कार्यकर्त्या तेथे अनेक वर्षांपासून लढा देत आहे. त्याचे फळ त्यांना आता या निर्णयाने मिळाले आहे. ही बंदी झुगारल्यामुळे अनेक उजव्या विचारसरणीच्या महिला कार्यकर्त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे

रियाध - कर्मठ व पुराणमतवादी देश असलेल्या सौदी अरेबिया देशातील महिलांना वाहन चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. सौदीचे राजे सलमान बिन अब्दुलअझित अल सौद यांनी या क्रांतिकारी निर्णयाची घोषणा केली. देशातील महिलांना वाहन चालविण्याचा परवाना देण्याचा वटहुकुम त्यांनी काढल्याचे वृत्त येथील सरकारी दूरचित्रवाहिनीने दिले आहे.

सौदी अरेबियात महिलांवर अनेक बंधने आहेत. त्यातील एक म्हणजे महिलांना वाहन चालविण्यास तेथे बंदी आहे. महिलांवर दडपशाही करणाऱ्या आखाती देशांमधील एक अशी सौदीची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख आहे. ही बंधने हटविण्यासाठी महिला कार्यकर्त्या तेथे अनेक वर्षांपासून लढा देत आहे. त्याचे फळ त्यांना आता या निर्णयाने मिळाले आहे. ही बंदी झुगारल्यामुळे अनेक उजव्या विचारसरणीच्या महिला कार्यकर्त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. वाहन चालविण्याचा परवाना देण्यासाठी लागणारी यंत्रणा आणि यानिमित्ताने तयार होणाऱ्या लाखो चालकांना सामावून घेण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात येणार असल्याने महिलांच्या हातात प्रत्यक्ष वाहन येण्यासाठी जून 2018 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

राजे सलमान यांच्या या निर्णयाने देशात परिवर्तन घडविण्यासाठी आखलेल्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी होत असल्याचे यातून दिसून आले आहे. धर्मांध शक्तींना यामुळे चपराक बसली असली तरी अपेक्षेनुसार पुराणमतवदी धर्मगुरूंनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. वाहन चालविण्यावरील बंदी उठविल्याने देशात अराजक माजेल, असा दावा त्यांनी केला आहे. यातील एकाने तर वाहन चालविल्यामुळे महिलांच्या गर्भाशयाला धोका उत्पन्न होईल, असा अजब शोधही लावला आहे. मात्र सौदीसह परदेशातही या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागतच होत आहे.

Web Title: Saudi Arabia Agrees to Let Women Drive