ब्रिटनमधील दहशतवाद, जिहादी विचारसरणीस सौदी अरेबियाचे भक्कम पाठबळ...

वृत्तसंस्था
बुधवार, 5 जुलै 2017

धार्मिक विद्वेषाची पेरणी करणारे इस्लामिस्ट आणि जिहादी संघटना व त्यांना आखातामधून मिळणारा निधी, हे समीकरण दिवसेंदिवस अधिकाधिक ठळक होत चालल्याचे या अहवालामधून स्पष्ट करण्यात आले आहे. ब्रिटनमधील सौदी अरेबियाच्या दूतावासाने हे आरोप निखालस खोटे असल्याची भूमिका घेतली आहे.

लंडन - ब्रिटनमध्ये इस्लामी मूलतत्त्ववादाचा प्रसार करण्यामध्ये सौदी अरेबिया देशाची मुख्य भूमिका असल्याचे निरीक्षण येथील एका प्रसिद्ध थिंक टॅंकच्या अहवालामध्ये नोंदविण्यात आले आहे. ब्रिटन व युरोपमध्ये घडविण्यात आलेले दहशतवादी हल्ले व आखातामधून येणाऱ्या निधीचा थेट संबंध असल्याचे स्पष्ट करत या अहवालाच्या माध्यमामधून सौदी अरेबिया व इतर आखाती देशांची यासंदर्भात सार्वजनिक पातळीवर चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

परराष्ट्र संबंध व जागतिक राजकारणावर संशोधन करणाऱ्या "हेन्री जॅक्‍सन सोसायटी' या थिंक टॅंकने हा अभ्यास अहवाल तयार केला आहे. धार्मिक विद्वेषाची पेरणी करणारे इस्लामिस्ट आणि जिहादी संघटना व त्यांना आखातामधून मिळणारा निधी, हे समीकरण दिवसेंदिवस अधिकाधिक ठळक होत चालल्याचे या अहवालामधून स्पष्ट करण्यात आले आहे. ब्रिटनमधील सौदी अरेबियाच्या दूतावासाने हे आरोप निखालस खोटे असल्याची भूमिका घेतली आहे. ब्रिटनमधील सरकारवर आता या समस्येविषयी स्पष्ट भूमिका घेण्यासंदर्भात दबाव आहे.

सौदी अरेबियासहित आखातामधील इतर देश व इराणदेखील मूलतत्त्ववादी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या मशिदी व इतर इस्लामिक संस्थांना सढळ हाताने मदत करत असल्याची माहिती या अहवालामधून देण्यात आली आहे. आखाती देशांशी ब्रिटनचे असलेले संबंध लक्षात घेता ब्रिटीश सरकारपुढील हे आव्हान अत्यंत जटिल असल्याचे मानले जात आहे.