आखातात मोठे राजनैतिक संकट

पीटीआय
मंगळवार, 6 जून 2017

कतार इसिसला पाठिंबा देत आहे, त्यामुळे येमेनमधील सौदीच्या नेतृत्वाखालील युद्धात लढत असलेल्या कतारच्या सैनिकांनाही माघारी पाठविण्यात येणार असल्याची घोषणा सौदीने केली आहे. दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अनेक विमान कंपन्यांनी कतारला जाणारी आणि येणारी विमान सेवा स्थगित केली आहे

दुबई -  कतारबरोबर असलेले राजनैतिक संबंध तोडण्यात आल्याची घोषणा चार अरब देशांनी आज केली. बहरिन, इजिप्त, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) या चार देशांनी याबाबतची घोषणा केल्यानंतर आखाती देशांमधील दरी आता अधिक वाढली आहे. दहशतवादाला पाठिंबा देणे आणि आखातात अशांतता निर्माण केल्याचा आरोप कतारवर करण्यात आला आहे. मात्र, कतारने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

इराणशी असलेली जवळीक आणि इसिसला पाठिंबा देणे या कारणांमुळे कतारशी असलेले संबंध तोडण्यात आले असल्याची घोषणा बहरिन, इजिप्त, सौदी अरेबिया आणि यूएई या देशांनी आज केली. कतारमधून आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी बोलवण्यात आले असल्याचे या देशांनी म्हटले आहे. तसेच, कतारच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी 48 तासांत देश सोडून जाण्याचे आदेश या देशांनी दिले आहेत. त्यामुळे आखाती देशांमधील अंतर्गत वाद आता चिघळण्याची शक्‍यता आहे.

कतार इसिसला पाठिंबा देत आहे, त्यामुळे येमेनमधील सौदीच्या नेतृत्वाखालील युद्धात लढत असलेल्या कतारच्या सैनिकांनाही माघारी पाठविण्यात येणार असल्याची घोषणा सौदीने केली आहे. दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अनेक विमान कंपन्यांनी कतारला जाणारी आणि येणारी विमान सेवा स्थगित केली आहे.

- कतारच्या नागरिकांना 14 दिवसांत यूएई सोडण्याचे आदेश
- येमेननेही कतारबरोबरचे संबंध तोडले
- आखातातील राजनैतिक संकट चिघळले
- कच्च्या तेलाच्या किमतीत 1.24 टक्‍क्‍यांची वाढ
- कतारला जाणारी विमाने अनेक विमान कंपन्यांनी रद्द केली