अस्वस्थ सौदीत मोठा निर्णय; युवराजांची उचलबांगडी

वृत्तसंस्था
बुधवार, 21 जून 2017

57 वर्षीय मोहम्मद बिन नायेफ यांच्याकडून सौदी अरेबियाच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाचे प्रमुखपदही काढून घेण्यात आले आहे. त्यांनी नव्या युवराजाप्रती निष्ठा व्यक्त केली असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे

रियाध - सौदी अरेबियाचे राजे किंग सलमान यांनी सौदी अरेबियाचे सध्याचे युवराज (क्राऊन प्रिन्स) मोहम्मद बिन नायेफ यांची उचलबांगडी करुन त्यांच्या जागी मोहम्मद बिन सलमान यांची नेमणूक केल्याची घोषणा आज (बुधवार) केली.

मोहम्मद बिन सलमान हे किंग सलमान यांचे पुत्र आहेत; तर मोहम्मद बिन नायेफ हे त्यांचे पुतणे आहेत. यामुळे किंग सलमान यांच्यानंतर सौदीचे राजेपद 31 वर्षीय मोहम्मद बिन सलमान यांच्याकडे येणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. या राजाज्ञेमुळे सध्या सौदीच्या संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत असलेल्या मोहम्मद बिन सलमान यांच्याकडे सौदीच्या उपपंतप्रधानपदाची धुराही सोपविण्यात येणार आहे.

57 वर्षीय मोहम्मद बिन नायेफ यांच्याकडून सौदी अरेबियाच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाचे प्रमुखपदही काढून घेण्यात आले आहे. त्यांनी नव्या युवराजाप्रती निष्ठा व्यक्त केली असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

पश्‍चिम आशियातील सध्याचे तप्त राजकारण व सौदी अरेबियामधील अंतर्गत तणावांच्या पार्श्‍वभूमीवर वृद्ध किंग सलमान यांच्याकडून घेण्यात आलेला हा निर्णय अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.