सौदी अरेबियात "मिनिस्कर्ट'मधील महिला आढळल्याने उडाली खळबळ

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जुलै 2017

या व्हिडिओमुळे ट्विटरवर अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटली. या महिलेने सौदीमधील नियमांचे उल्लंघन केल्याने तिला त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी अनेक सौदी नागरिकांनी केली होती

रियाध - महिलांना परंपरावादी इस्लामिक वेषभूषा करणे बंधनकारक असलेल्या सौदी अरेबियामधील सार्वजनिक ठिकाणी "मिनीस्कर्ट' घातलेली एका महिला आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. या घटनेवरुन मोठा गदारोळ माजल्यानंतर सौदी प्रशासनाने "आक्षेपार्ह वेषभूषा' केल्याप्रकरणी या महिलेस अटक केली आहे. या महिलेचे नाव उघड करण्यात आलेले नाही.

सौदी अरेबियामधील एका ऐतिहासिक ठिकाणी मिनिस्कर्ट परिधान घातलेली ही महिला फिरत असल्याचे चित्रीकरण स्नॅपचॅटच्या माध्यमामधून प्रसिद्ध झाले होते. नज्द भागामधील एका गावामधील हे चित्रीकरण होते. नज्द भाग हा सौदी अरेबियामधील परंपरावादी दृष्टिकोनाचे माहेरघर समजला जातो. या व्हिडिओमुळे ट्विटरवर अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटली. या महिलेने सौदीमधील नियमांचे उल्लंघन केल्याने तिला त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी अनेक सौदी नागरिकांनी केली होती.

सौदी अरेबियामध्ये महिलांना, अगदी परदेशी महिलांनासुद्धा पायघोळ वेशभूषा करणे बंधनकारक आहे. या पार्श्‍वभूमीवर ही घटना अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.