नवाज शरीफ यांनी फेटाळली राजीनाम्याची मागणी

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 जुलै 2017

राजकारणात आल्यानंतर मी काहीच कमावले नाही, उलट अनेक गोष्टी गमावल्या आहेत. तपास समितीने माझ्याविरोधात अहवालात वापरलेली भाषा पूर्वग्रहदूषित आहे. माझ्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांनी आधी स्वत:कडे पाहावे

इस्लामाबाद - पनामा पेपर्स प्रकरणात अडकलेले पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी विरोधकांनी केलेली राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली आहे. शरीफ यांनी आज तातडीने बोलाविलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी हा निर्णय जाहीर केला.

पनामा पेपर्स प्रकरणी संयुक्त तपास समितीने नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात बेकायदा संपत्ती जमा केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे सर्व विरोधकांनी शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. मात्र, तपास समितीने केलेले सर्व आरोप खोटे असल्याचा दावा करत शरीफ यांनी राजीनामा देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.

मला नागरिकांनी पंतप्रधान म्हणून निवडून दिले असल्याने फक्त तेच मला पदावरून दूर करू शकतात, असे शरीफ यावेळी म्हणाले. ते म्हणाले,""राजकारणात आल्यानंतर मी काहीच कमावले नाही, उलट अनेक गोष्टी गमावल्या आहेत. तपास समितीने माझ्याविरोधात अहवालात वापरलेली भाषा पूर्वग्रहदूषित आहे. माझ्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांनी आधी स्वत:कडे पाहावे.''