जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांच्या लोकप्रियतेला ओहोटी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 जुलै 2017

अबे यांनी आपल्या मित्राच्या व्यवसायाला फायदा होईल, असे निर्णय घेतल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. तसेच, अबे यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न त्यांच्याच मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांकडून केले जात आहेत

टोकियो - जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांच्या लोकप्रियतेत घट होत असल्याची माहिती समोर आली आहे. अबे हे आपल्याला गृहीत धरत आहेत, असे मत मतदारांचे बनले असून, त्यामुळे त्यांची लोकप्रियता 30 टक्‍क्‍यांच्याही खाली घसरल्याचे आज एक पाहणीतून उघड झाले.

अबे यांनी आपल्या मित्राच्या व्यवसायाला फायदा होईल, असे निर्णय घेतल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. तसेच, अबे यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न त्यांच्याच मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांकडून केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर अबे यांच्या लोकप्रियतेत घट झाली असून, ती 30 टक्‍क्‍यांच्याही खाली गेली असल्याचे नुकत्याच केलेल्या एका पाहणीत दिसून आले आहे.

तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या अबे यांचा कार्यकाळ सप्टेंबर 2018मध्ये संपणार असून, सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षपदी त्यांची पुन्हा निवड होऊ शकते, अशी शक्‍यता काही दिवसांपर्यंत व्यक्त करण्यात येत होती. मात्र, अलिकडे घडलेल्या काही घटनांमुळे अबे यांच्या लोकप्रियतेत घट झाली असल्याचे पाहणीत म्हटले आहे.

निवडणूक पाहणीला आपण गांभीर्याने घेतले असल्याची प्रतिक्रिया जपान सरकारच्या प्रवक्‍याने दिली आहे. जपानच्या मंत्रिमंडळात करण्यात आलेल्या फेरबदलांचा फारसा फायदा अबे यांना होताना दिसत नाही. जपानच्या पंतप्रधानपदी दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वाधिक काळ राहिलेले अबे हे दुसरे व्यक्ती आहेत.