3 वर्षांपूर्वी बुडालेले महाकाय जहाज वर काढले

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

शालेय सहलीसाठी गेलेले 300 हून अधिक विद्यार्थी या अपघातात बुडून मृत्युमुखी पडले होते. सेवोल नावाचे हे जहाज 16 एप्रिल 2014 रोजी बुडाले तेव्हा दक्षिण कोरियावर शोककळा पसरली होती.

सोल : सुमारे 6800 टन वजनाचे जहाज खवळलेल्या समुद्राच्या प्रचंड लाटांनी उलटून बुडाल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी वर काढण्यात यश आले आहे. 

प्रवासी वाहूतक करणारे हे जहाज दक्षिण कोरियाच्या नैऋत्य किनारपट्टीवर बुडाले होते. या देशाच्या समुद्री हद्दीतील ही सर्वांत मोठ्या आपत्ती असल्याने हे जहाज वर काढणे हा एक येथील देशवासीयांसाठी भावुक करणारा क्षण होता. 

शालेय सहलीसाठी गेलेले 300 हून अधिक विद्यार्थी या अपघातात बुडून मृत्युमुखी पडले होते. सेवोल नावाचे हे जहाज 16 एप्रिल 2014 रोजी बुडाले तेव्हा दक्षिण कोरियावर शोककळा पसरली होती. यामुळे प्रदीर्घ काळापासून दुर्लक्षित राहिलेला सार्वजनिक सुरक्षितता आणि नियमनाचा प्रश्न ऐरणीवर आला. सरकारच्या ढिसाळ कारभाराविरोधात येथील लोकांमध्ये असंतोष वाढला आणि त्याची परिणती म्हणजे अलीकडेच दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क गेऊनहै यांची गच्छंती झाली. 

या जहाजाचा कप्तान त्या अपघातातून बचावला होता. त्याने इतरांना बाहेर पडण्याच्या सूचना न देता स्वतः जहाजातून पळून गेला. त्यामुळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून सदोष मनुष्यवध केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.