समुद्रात बुडणाऱ्या हत्तींना श्रीलंकेच्या नौदलाने वाचविले

वृत्तसंस्था
सोमवार, 24 जुलै 2017

लहान जहाजांवरून हत्तींना उथळ पाण्यापर्यंत पोचविण्यात आले. हत्ती किनाऱ्यापर्यंत सुरक्षित आल्यानंतर त्यांना त्रिनकोमली जिल्ह्यातील फाऊल पॉइंट जंगल या ठिकाणी सोडण्यात आले

कोलंबो - हिंदी महासागरात बुडणाऱ्या दोन हत्तींना वाचविण्यात श्रीलंकेच्या नौदलाला यश आले. हे 'मदतकार्य' काल (रविवार) करण्यात आले. काही आठवड्यांपूर्वीही अशीच एक घटना घडली होती.

समुद्रात गस्त घालणाऱ्या श्रीलंकेच्या नौकेतील कर्मचाऱ्यांना हत्तीची जोडी समुद्रात गटांगळ्या खात असल्याचे दिसले. हत्तींच्या बचावासाठी त्यांनी अन्य नावांना मदतीची हाक दिली. नौदलाचे पाणबुडे, दोरखंड व लहान जहाजे यांच्या मदतीने युद्धपातळीवर प्रयत्न करून वन्य हत्तींची सुटका करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या लहान जहाजांवरून हत्तींना उथळ पाण्यापर्यंत पोचविण्यात आले. हत्ती किनाऱ्यापर्यंत सुरक्षित आल्यानंतर त्यांना त्रिनकोमली जिल्ह्यातील फाऊल पॉइंट जंगल या ठिकाणी सोडण्यात आले.

दोन आठवड्यांपूर्वीही हिंदी महासागरात किनाऱ्यापासून आठ किलोमीटरवर खोल पाण्यात बुडत असलेल्या एका हत्तीला वाचविण्यात नौदलाला यश आले होते. समुद्रालगतच्या खाजण ओलांडताना हे हत्ती पाण्यात पडले असण्याची शक्‍यता नौदल अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या बेटांवरील केवळ वन्यप्राण्यांचेच नव्हे, तर नौदलाने त्रिनकोमाली बंदरावर आलेल्या 20 देवमाशांचेही प्राण वाचविले होते.