मिस्टर प्रेसिडेंट, आमची सुरक्षा कोण करणार?

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

अमेरिकेत इतरत्र वंशद्वेशातून झालेल्या हत्येच्या बातम्या वाचून मला भीती वाटत होती. अशाच प्रकारच्या हल्ल्यात माझ्या पतीची हत्या झाली असली तरी माझ्या पतीचे अमेरिकेबद्दलचे मत नेहमीच चांगले होते

ह्यूस्टन - अमेरिकेत वंशद्वेशातून अल्पसंख्याकावर होत असलेले हल्ले थांबविण्यासाठी अमेरिकी सरकार काय पावले उचलणार आहे? असे स्पष्ट सवाल हत्या झालेल्या भारतीय अभियंत्याच्या पत्नीने विचारला आहे. मूळचा हैदराबादचा असलेला भारतीय अभियंता श्रीनिवास कुचीभोतला यांची कान्सास शहरात एका अमेरिकी नागरिकाने वंशद्वेशातून हत्या केली होती.

हत्या झालेल्या श्रीनिवास यांची पत्नी सुनयना दुमाला यांनी आज पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या. वंशद्वेशातून होत असलेल्या हल्ल्यांमुळे अमेरिकेतील अल्पसंख्याक समुदायात सध्या भीतीचे वातावरण आहे. हे हल्ले रोखण्यासाठी अमेरिकी सरकार काय पावले उचलते आहे, असा प्रश्न सुनयना यांनी उपस्थित केला.

ट्रम्प यांचे नाव न घेता त्या म्हणाल्या की, अलीकडच्या काळात अल्पसंख्याक समुदायावरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. अमेरिकेत इतरत्र वंशद्वेशातून झालेल्या हत्येच्या बातम्या वाचून मला भीती वाटत होती. अशाच प्रकारच्या हल्ल्यात माझ्या पतीची हत्या झाली असली तरी माझ्या पतीचे अमेरिकेबद्दलचे मत नेहमीच चांगले होते. अमेरिकेत चांगल्या गोष्टी घडतात असे तो म्हणायचा. अमेरिकेत राहून आम्ही चूक तर करत नाही ना? असेही सुनयना म्हणाल्या. कान्सास येथील एका हॉटेलमध्ये श्रीनिवास याची एका अमेरिकी नागरिकाने वंशद्वेशातून हत्या केली होती. या वेळी गोळीबारात श्रीनिवासच्या मित्रासह एक अमेरिकी नागरिकही गंभीर जखमी झाला होता. श्रीनिवास हा 2005 मध्ये उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत आला होता. त्यानंतर तो सुरवातीला आयोवा आणि नंतर कान्सास शहरात अभियंता म्हणून नोकरी करत होता.